नवी दिल्ली : दिवाळीत सर्वत्र रोषणाई, रांगोळ्या काढल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, यंदाच्या दिवाळीत फटाके विक्रीवर आणि फोडण्यावर न्यायालयाने बंदी घातली आहे.
न्यायालयाने बंदी घातली असली तरी अनेक ठिकाणी सर्रासपणे फटाके विक्री केली जात असल्याचं दिसत आहे. अशाच प्रकारे विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
दिल्लीमध्ये पोलिसांनी कारवाई करत १,२०० किलोहून अधिक फटाके जप्त केले आहेत. तर, या प्रकरणी २९ जणांना अटक केली आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर दिल्ली पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांनी पोलीस उपायुक्तांना निर्देश दिले होते की या आदेशाचं पालन होत आहे की नाही यावर लक्ष द्या. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी मधुर वर्मा यांनी सांगितले की, न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी १,२४१ किलोग्रॅमचे फटाके आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. तर, २९ जणांना अटक करत गुन्हा दाखल केला आहे.
फटाक्यांमुळे अनेकांना आनंद मिळत असतो. मात्र, फटाक्यांच्या आवाजामुळे आणि धुरामुळे होणारे दुष्परिणाम आपल्याला सहन करावे लागतात. ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण होते हे सर्वांनाच माहिती आहे पण त्यासोबत याचा प्राण्यांनाही त्रास होतो.