डेंग्यूची लस लवकरच बाजारात; 10 हजारांहून अधिक लोकांवर लसीची चाचणी

जीवघेण्या डेंग्यू आजारावर रामबाण उपाय सापडला आहे. पुढच्या वर्षी डेंग्यूची लस येणार आहे. आयसीएमआरने याबाबत माहिती दिली आहे. तिस-या टप्प्यात 10 हजारांहून अधिक लोकांवर लसीची चाचणी होणार आहे.  

Updated: Nov 27, 2023, 08:26 PM IST
डेंग्यूची लस लवकरच बाजारात; 10 हजारांहून अधिक लोकांवर लसीची चाचणी title=

Dengue Vaccine : डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूंवर लवकरच नियंत्रण मिळवण्यात यश येणार आहे. डेंग्यूची लस लवकरच बाजारात येत आहे. ही लस पुढील वर्षी बाजारात येऊ शकते, ICMRनं ही माहिती दिली आहे. यामुळे डेंग्यू रुग्णांना दिलासा मिळणार आहे.  

तिस-या टप्प्यात 10 हजारांहून अधिक लोकांवर या लशीची चाचणी करण्यात आली. ICMR च्या एपिडेमियोलॉजी आणि कम्युनिकेबल डिसीजच्या प्रमुख डॉ. निवेदिता गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली. आयसीएमआरच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यूच्या लसीवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

चाचणीच्या पहिल्या टप्प्यात डेंग्यू लसीची सुरक्षितता तपासण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात लसीपासून शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीजची चाचणी घेण्यात आली. आता तिस-या टप्प्यात ही लस डेंग्यूवर काम करत आहे की नाही हे कळेल. देशातील 20 विविध केंद्रांवर 18 ते 80 वर्षे वयोगटातील एकूण 10 हजार लोकांवर ही चाचणी घेण्यात येणार आहे. लसीबाबत अधिक माहिती पाहूया.

कशी असेल लस? 

मुलांसाठी आणि प्रौढांसाठी वेगवेगळ्या लस तयार करण्यात आल्या आहेत. प्रौढ लसीच्या दोन चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. लहानग्यांच्या लसीच्या पहिल्या टप्प्याची चाचणी पूर्ण झाली आहे.  डेंग्यूवर अद्याप इलाज नाही. यामुळे लस महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.  त्यामुळे डेंग्यूमुळे होणारे मृत्यू रोखण्यात येत्या काळात यश येणार आहे.

अजित पवार यांना डेंग्यूची लागण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. विश्रांतीनतंर अजित पवार पुन्हा कामाला लागले आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील डेंग्यूची लागण झाली होती. 
डेंग्यूची लागण जाल्यावर  काय काळजी घ्याल?  
ताप, अशक्तपणा, अंगदुखी, उलटी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. डेंग्यू झालेल्या रूग्णाच्या शरीरातील प्लेट्सलेट्सची संख्या सातत्यानं घटत असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्लेटलेट् काऊंट वाढवण्यावर भर द्या..नियमितपणे पोषक आहार घ्या.