coronavirus : जगातील सर्वात कमी मृत्यूदर भारतात; कोरोना चाचण्यांचाही रेकॉर्ड

भारतातील मृत्यूदर सर्वात कमी 1.87 टक्के आहे.

Updated: Aug 23, 2020, 09:17 AM IST
coronavirus : जगातील सर्वात कमी मृत्यूदर भारतात; कोरोना चाचण्यांचाही रेकॉर्ड  title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन  (Dr. Harshvardhan) यांनी लोकांना कोरोना व्हायरस महामारीला घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. देशात कोरोनातून बरे होण्याचा दर जवळपास 75 टक्के इतका आहे आणि यात दररोज वाढ होत आहे. भारतातील मृत्यूदरही सर्वात कमी 1.87 टक्के आहे, असं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. 

आठ महिन्यांच्या लढाईनंतर भारतात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सर्वात उत्तम 75 टक्के आहे. 22 लाख रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर सध्या सात लाख रुग्णांवर उपचार सुरु असून तेदेखील लवकरच बरे होतील, असा विश्वासही केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO),भारत दर एक लाख लोकसंख्येवर सुमारे 74.7 लोकांची चाचणी करत आहे. जे प्रति एक लाख लोकसंख्येवर14 लोकांची चाचणी करण्याच्या WHOच्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा अधिक आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताने शुक्रवारी एक नवा रेकॉर्ड केला आहे. भारतात एका दिवसात 10 लाखहून अधिक लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, शुक्रवारी जवळपास 10 लाख 23 हजार 836 चाचण्या करण्यात आल्या. हा रेकॉर्ड असून आतापर्यंत देशात जवळपास 3.4 कोटीहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, चाचणी प्रयोगशाळांच्या वाढत्या नेटवर्कमुळे हे यश शक्य झाल्याचं म्हटलं आहे.

देशात सध्या जवळपास 1511 कोरोना टेस्ट लॅब काम करत आहेत. ज्यात 983 सरकारी आणि 528 खासगी क्षेत्रातील आहेत.