Whale Ambergris Smuggling: महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) (Directorate of Revenue Intelligence) तस्करी करणाऱ्या एका टोळक्याचा पर्दाफाश केला आहे. एम्बरग्रीस (whale ambergris) म्हणजेच व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी करणाऱ्या एका टोळीला डीआरआयने ताब्यात घेतलं आहे. तामिळनाडूमधील तूततीकोरिन समुद्रकिनारी डीआरआयने ही कारवाई केली या टोळीतील तस्करांकडून तब्बल 18.1 किलोग्राम वजनाची उलटी डीआरआयने ताब्यात घेतली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या उलटीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत, 31 कोटी 67 लाख रुपये इतकी आहे. भारतामधून तस्करी करुन हे एम्बरग्रीस देशाबाहेर पाठवण्याचा तस्कराचा डाव यंत्रणांनी हाणून पाडला आहे.
या अटकेसंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. 4 जणांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. हे चारही जण तामिळनाडू आणि केरळचे रहिवाशी असल्याची माहिती डीआरआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना दिली. हे चौघेही मागील बऱ्याच काळापासून एम्बरग्रीसची तस्करी करण्याच्या कटात सहभागी होते. या चौघांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे. या एम्बरग्रीसची तस्करी केली जाणार असल्याची गुप्त माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून छापेमारी करण्यात आली. याच छापेमारीत या चौघांना अटक करण्यात आली आहे.
"18 मे रोजी मध्यरात्रीनंतर एक टोळी हार्बर बीच तूतीकोरिनच्या किनाऱ्याजवळ समुद्रातून श्रीलंकेला एम्बरग्रीसची तस्करी करण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली होती," असं या अधिकाऱ्याने सांगितलं. खबऱ्यांकडून ही माहिती मिळाल्यानंतर डीआरआयच्या टीम सक्रीय झाल्या. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी छापेमारीदरम्यान नाकाबंदीला एक ट्रक अडवला. या छोट्या आकाराच्या ट्रकमध्ये पुढील सीटच्या खाली 18.1 किलोचं एम्बरग्रीस आढळून आलं. ट्रकमधील आरोपींनी आपण तस्करीमध्ये सहभागी असल्याचा गुन्हा कबुल केल्याची माहितीही अधिकाऱ्याने दिली.
#WATCH | Tamil Nadu: DRI arrested 4 smugglers and seized 18.1 Kg whale ambergris worth Rs 31.6 crores, near the Tuticorin Sea coast: Customs
(Video source: Customs pic.twitter.com/b2FAH5hgVz
— ANI (@ANI) May 20, 2023
व्हेल माशाची उलटी वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 मधील अनुसूची 2 अंतर्गत संरक्षित आहे. त्यामुळेच ही उलटी बाळगणे, तिची निर्यात करणे, देवाण-घेवाण करणे कायद्याने गुन्हा आहे. "मागील 2 वर्षांमध्ये डीआरआयने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 54 कोटी रुपये किंमत असलेली 40.52 किलो एम्बरग्रीस छापेमारीदरम्यान जप्त केली आहे. तूतीकोरिन समुद्रकिनाऱ्यावरुनच हे एम्बरग्रीस भारताबाहेर तस्करी करण्याचा प्रयत्न झाला होता," असं डीआरआयने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.