Chief Justice DY Chandrachud Heartening Gesture: सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच देशाचे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठासमोर मंगळवारी एक फारच रंजक प्रकार घडला. सरन्यायाधिशांनी कोर्टाचं कामकाज सुरु असताना असं काही केलं की त्यांच्या कृतीने साऱ्यांचं मन जिंकलं. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता कोर्टामध्ये आपली भूमिका मांडताना युक्तीवाद करत होते. मेहता यांचा युक्तीवाद सुरु असतानाच अचानक सरन्यायाधिशांनी त्यांना हटकलं. त्यांनी मेहता यांना त्यांच्या मागे उभ्या असलेल्या कनिष्ठ वकिलांबद्दल विचारलं. उभ्याने हे वकील सुनावणीला हजर असल्यावर सरन्यायाधिशांनी आक्षेप घेतला. सरन्यायाधीश एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी या कनिष्ठ वकिलांना बसण्यासाठी स्टूलची व्यवस्थाही केली.
सुप्रीम कोर्टामध्ये 9 न्यायाधिशांच्या खंडपिठासमोर एक सुनावणी सुरु होती. राज्यांकडे औद्योगिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या मद्याची विक्री आणि निर्मिती करण्याचा हक्क आहे का? यासंदर्भात सुनावणी सुरु होती. 1990 साली सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधिशांच्या खंडपिठाच्या निकालाला आव्हान देणारी ही याचिका होती. सुनावणीदरम्यान तुषार मेहता यांनी केंद्र सरकारची बाजू मांडत होते. याचवेळेस चंद्रचूड यांनी, "मिस्टर सॉलिसिटर, आपले सर्व कनिष्ठ सहकारी संपूर्ण दिवस हातात लॅपटॉप घेऊन उभे असतात. दुपारी, कोर्ट मास्टर याची चाचपणी करतील की तुम्ही उभे असलेल्या मागील बाजूच्या रिकाम्या जागेत त्यांना बसण्याची व्यवस्था करता येईल का," असं मेहता यांना म्हटलं.
सरन्यायाधिशांनीच हा मुद्दा उपस्थित केल्याने तुषार मेहता यांनी आपणही या गोष्टीकडे लक्ष ठेऊन होतो असं म्हटलं. कोर्टात संबंधित प्रकरणाशी संलग्न नसलेल्या वकिलांनी कनिष्ठ वकिलांसाठी खुर्च्या रिकाम्या कराव्यात अशी विनंती आपण केली होती, असंही मेहता म्हणाले. यावर सरन्यायाधिशांनी, "मी आता कोर्ट मास्टरकडून हे जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत की त्या ठिकाणी छोटे स्टूल ठेवता येतील का? आपण प्रयत्न करुन त्या ठिकाणी काही स्टूलची व्यवस्था करुयात," असं म्हटलं.
दुपारच्या जेवणाच्या ब्रेकनंतर कोर्टामध्ये पुन्हा सुनावणी सुरु झाल्यानंतर सर्वजण कोर्टाच्या दालनात दाखल झाल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ज्या ठिकाणाबद्दल मगाशी चर्चा सुरु होती तिथे छोट्या आकाराचे स्टूल एका रांगेत ठेवले होते. सुप्रीम कोर्टातील रजिस्ट्रीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधिशांनी कनिष्ठ वकिलांना कोर्टाची सुनावणी सुरु असताना आसनस्थ होता यावं यासाठी स्टूलची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते.
नक्की पाहा >> 'माझ्यावर ओरडू नका!' म्हणत संतापले सरन्यायाधीश चंद्रचूड; सारा प्रकार कॅमेरात कैद! पाहा Video
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या जेवणाऱ्या ब्रेकनंतर कोर्टाची कारवाई सुरु होण्याआधी सरन्यायाधीशांनी स्वत: बसण्याची ही आसनव्यवस्था तपासून पाहिली. स्वत: सरन्यायाधीश चंद्रचूड कोर्टामध्ये नव्याने स्टूल बसवण्यात आलेल्या जागी गेले. त्यांनी कनिष्ठ वकील सुनावणीदरम्यान दाटीवाटीने उभे होते त्या ठिकाणची पहाणी केली. त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी व्यवस्थित करता येतील याची चापणी केली. नव्याने बसवण्यात आलेल्या स्टूलवर सरन्यायाधीश स्वत: जाऊन बसले. सरन्यायाधिशांनी या ठिकाणीची पहाणी केली. तसेच या नव्या स्टूलच्या रांगेमुळे सॉलिसिटर जनरल मेहता यांनी त्रास होणार नाही याचीही खात्री सरन्यायाधिशांनी करुन घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. चंद्रचूड यांनी त्यांच्या या कृतीने सर्वांचीचं मनं जिंकली.