ई-कॉमर्स कंपन्या देतायत १.२ कोटी नोकऱ्या, सोशल सेक्टरमध्येही लाखो रोजगार

पुढील १० वर्षांत ई-कॉमर्स कंपन्यांमधन १.२ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 18, 2017, 04:22 PM IST
 ई-कॉमर्स कंपन्या देतायत १.२ कोटी नोकऱ्या, सोशल सेक्टरमध्येही लाखो रोजगार  title=

नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पुढील १० वर्षांत ई-कॉमर्स कंपन्यांमधन १.२ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

सोशल सेक्टर संबंधित आणि योजनांमध्येही लाखो रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. यूकेची सर्वात मोठी बँक आणि टॉपची ब्रोकरेज फर्म असलेल्या एचएसबीसीने यासंबंधीचे निष्कर्ष लावले आहेत. यामुळे रोजगाराच्या मुद्द्यावरून अडचणींत सापडलेल्या मोदी सरकारलादेखील या बातमीने दिलासा मिळू शकतो.

सोशल सेक्टरमध्ये खूप काम 

एचएसबीसीने मोदी सरकारला सावध केले आहे की, सामाजिक क्षेत्रातील नोकरीच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रचंड काम करावे लागणार आहे. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रातही मेहनत घेण्याची गरज आहे.

उत्पादन आणि कृषी क्षेत्रांवर लक्ष केंद्रित

प्रचंड रोजगार निर्माण करण्यासाठी, सरकारने उत्पादन आणि शेतीसारख्या क्षेत्रांकडे पुरेसे लक्ष देणे आवश्यक आहे. बँकेच्या मते, भारताची कहाणी ही निर्यातच आधार असलेल्या चीनच्या धोरणापेक्षा वेगळी आहे. कारण इथे ५५ कोटीहून अधिक ग्राहक  देशांतर्गत वस्तूंचा वापर करत असतात.

भारत ही तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था 

पुढील १० वर्षांत जपान आणि जर्मनीला मागे टाकून भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे. तथापि, आरोग्य आणि शिक्षणासारख्या सामाजिक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. ब्रिटिश बँक एचएसबीसीने या आशा व्यक्त केल्या आहेत, त्यापैकी बर्याच बाबतीत, भारताला भरपूर काम करावे लागणार आहे.

भारताची ७ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था

बँकेच्या मते, २०२८ पर्यंत भारत सात हजार अब्ज डॉलरच्या म्हणजेच ७ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणार आहे. सहा हजार अब्ज डॉलर्ससह जर्मनी चौथ्या आणि पाच हजार अब्ज डॉलर्ससह जपान पाचव्या स्थानावर असेल. २०१६-२०१७ च्या आर्थिक वर्षात भारताची २३०० अब्ज डॉलर्स म्हणजेच २.३ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे. भारत जगातील अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर आहे.