नवी दिल्ली: माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी.चिदंबरम सध्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) कचाट्यात सापडले आहेत. यानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, 'ईडी'ने सोनिया गांधी यांच्या खास मर्जीतील नेते अहमद पटेल यांच्या मुलाला चौकशीची नोटीस पाठवली आहे.
स्टर्लिंग बायोटेक प्रकरणात फैसल पटेल यांची चौकशी होणार असल्याचे समजते. या प्रकरणात 'ईडी'ने तिसऱ्यांदा फैसल यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणात ईडीने आतापर्यंत अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये कोट्यवधी रूपये जप्त करण्यात आले होते.
स्टर्लिंग बायोटेक ही गुजरातस्थित कंपनी आहे. या कंपनीवर आंध्रा बँकेत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मोठी नावे गुंतल्याची शक्यता आहे.
गेल्याच महिन्यात ईडीने अहमद पटेल यांचे जावई इरफान सिद्दिकी यांचीही चौकशी केली होती. या गैरव्यवहारात इरफान सिद्दिकी यांच्याविरोधात पुरावे मिळाल्याचा ईडीचा दावा आहे. तब्बल १४५०० कोटींच्या गैरव्यवहारात स्टर्लिंग बायोटेकचे मुख्य प्रवर्तक नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा प्रमुख आरोपी आहेत. हे सर्वजण सध्या फरार आहेत.
ईडीच्या तपासात संदेसरा समूहाने भारतीय बँकांच्या परदेशांतील शाखांमधूनही तब्बल ९००० कोटींचे कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे पैसे बनावट कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्यात आले. काही दिवसांपूर्वीच ईडीने संदेसरा समूहाची परदेशातील ९७७८ कोटींची संपत्ती जप्त केली होती. यामध्ये नायजेरियातील तेल खाणी, विमाने, जहाजे आणि लंडनमधील घराचा समावेश आहे.
संदेसरा समूहाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या नावाने भारतामध्ये २४९ आणि परदेशात ९६ बनावट कंपन्या सुरु केल्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातूनच पैसा इतरत्र वळवला जायचा आणि सरतेशेवटी तो नायजेरियात आणला जायचा. संसेदरा कुटुंबीय सध्या नायजेरियामध्ये लपल्याचा संशय ईडीला आहे. हे सर्वजण अहमद पटेल यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते.