'पूर्ण रक्कम द्या, वरपर्यंत...', 3 कोटींची लाच मागणाऱ्या ED अधिकाऱ्याचा 8 KM पाठलाग; धक्कादायक खुलासे

तामिळनाडूत सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्याला 20 लाखांचा लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. दरम्यान या प्रकरणी आता रोज नवनवे खुलासे होत आहेत. अधिकाऱ्याने प्रकरण दाबवण्यासाठी एकूण 3 कोटींची लाच मागितली होती.   

शिवराज यादव | Updated: Dec 2, 2023, 12:26 PM IST
'पूर्ण रक्कम द्या, वरपर्यंत...', 3 कोटींची लाच मागणाऱ्या ED अधिकाऱ्याचा 8 KM पाठलाग; धक्कादायक खुलासे title=

तामिळनाडूत सरकारी अधिकाऱ्याकडूनच 20 लाखांची लाच घेताना सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. राज्य दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंकित तिवारीला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान याप्रकरणी आता नवे खुलासे होत आहेत, ज्यामुळे खळबळ माजली आहे. अधिकाऱ्याला 15 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. 

अंकित तिवारीने एकूण 3 कोटींची लाच मागितली होती. यानंतर 51 लाखांमध्ये ही डील ठरली होती. अंकित तिवारी यामधील 20 लाखांचा दुसरा हफ्ता घेत असतानाच रंगेहाथ पकडत बेड्या ठोकण्यात आल्या. अंकित तिवारीला अटक केल्यानंतर ईडीच्या मदुराईमधील कार्यालयाचीही झडती घेण्यात आली. याशिवाय अधिकाऱ्यांनी त्याच्या घरातही सर्च ऑपरेशन केलं. सूत्रांच्या माहितीनुसार, तपासात याप्रकरणी मदुराई आणि चेन्नईमधील अनेक अधिकारी सहभागी असल्याचं समोर आलं आहे. 

अंकित तिवारी अनेक लोकांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून करोडोंची लाच घेत होता. लाच म्हणून मिळालेले हे पैसे तो इतर अधिकाऱ्यांमध्येही वाटत होता अशी सूत्रांची माहिती आहे. अंकित तिवारीकडून काही कागदपत्रंही जप्त करण्यात आली असून, मदुराई, चेन्नईतील काही ईडी अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाऊ शकते. 

कोणत्या प्रकरणी लाच घेताना अटक?

29 ऑक्टोबरला अंकित तिवारीने डिंडीगुल येथील सरकारी कर्मचाऱ्याशी संवाद साधला. या कर्मचाऱ्याविरोधातील डीव्हीएसी प्रकरणाचा उल्लेख केला, जे बंद झालं होतं. अंकित तिवारीने कथितपणे सरकारी अधिकाऱ्याला सांगितलं की, पीएमओने ईडीला या प्रकरणाचा तपास करण्यास सांगितलं असून, तुम्हाला चौकशीसाठी 30 ऑक्टोबरला मदुराईच्या ईडी कार्यालयात उपस्थित राहायचं आहे. 

सरकारी कर्मचारी मदुराईतील कार्यालयात पोहोचला असता अंकित तिवारीने त्याच्याकडे केस बंद करण्यासाठी 3 कोटींची लाच मागितली. यानंतर त्याने कर्मचाऱ्याला सांगितलं की, माझं माझ्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांशी बोलणं झालं असून 51 लाखात डील करण्यास तयार असल्याचा दावा केला. 1 नोव्हेंबरला सरकारी कर्मचाऱ्याने कथितपणे ईडी अधिकाऱ्याला 20 लाखांचा पहिला हफ्ता दिला. 

नंतर अंकितने सरकारी कर्मचाऱ्याला आपल्याला वरिष्ठांमध्ये पैसे वाटायचे आहेत असं सांगत सर्व रक्कम एकत्र देण्यास सांगितलं. अंकितने व्हॉट्सअप आणि मेसेज पाठवत सरकरी कर्मचाऱ्याला तसं न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला. 

अंकित तिवारीच्या मागण्या पाहून सरकारी कर्मचाऱ्याला संशय आला आणि त्याने 30 नोव्हेंबरला डीवायएसीच्या डिंडीगुल कार्यालयात तक्रार दाखल केली. 

1 डिसेंबरला अंकित तिवारी 20 लाखांचा दुसरा हफ्ता स्विकारत असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आलं. पोलिसांनी आरोपी अधिकाऱ्याला 8 किमी पाठलाग करुन पकडलं. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x