15 हजार पगार आणि 5 हजार जागा, सफाई कर्मचाऱ्याच्या पोस्टसाठी 46000 पदवीधारकांचा अर्ज

UnEmployment : सरकारकडून तरुणांना रोजगार दिले जात असल्याचे कितीही दावे केले जात असले तरी देशात बेरोजगारांची संख्या चिंता वाढवणारी आहे. एकेका जागेसाठी हजारो-लाखो अर्ज केले जात आहेत. यावरुन देशातील बेरोजगारीचा अंदाज येतो.

राजीव कासले | Updated: Sep 5, 2024, 09:57 PM IST
15 हजार पगार आणि 5 हजार जागा, सफाई कर्मचाऱ्याच्या पोस्टसाठी 46000 पदवीधारकांचा अर्ज title=

UnEmployment : सरकारकडून तरुणांना रोजगार दिले जात असल्याचे कितीही दावे केले जात असले तरी देशात बेरोजगारांची संख्या चिंता वाढवणारी आहे.  बेरोजगारी ही जगासाठी गंभीर समस्या बनली आहे. भारतातही अनेक दशकांपासून बेरोजगारीचा (Unemployment) मुद्दा कळीचा ठरतोय. याचं ज्वलंत उदाहरण नुकतंच पाहायाल मिळालं. 15 हजार रुपयांच्या सफाई कामगाराच्या जागेसाठी लाखो अर्ज आले. धक्कादायक म्हणजे यात पदवीधर उमेदवारांचे अर्ज लक्षणीय होते. हा आकडा चिंताजनक आहे. 

पदवीधर उमेवारांचा अर्ज
हरियाणा सरकारने राज्यात सफाई कामगार पदासाठी (Sweeper Post) पाच हजार जागांची भरती काढली. या पदासाठी पंधरा हजार रुपये इतकं वेतन निश्चित करण्यात आलं होतं. यासाठी आठवी पास शैक्षणिक पात्रता होती. पण नोकरीची जाहीरात प्रसिद्ध झाल्यानंतर या जागेसाठी हजारो तरुणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्ज पदवीधर, पदव्युत्तर तरुणांचे अर्ज होते. हा आकडा थोडाथोडका नाही तर तब्बल 46 हजार पदवीधर तरुणांनी सफाई कामगाराच्या जागेसाठी अर्ज केला होता. 

हरियाणा सरकार युवाशक्तीला स्वावलंबी बनवण्याचे अनेक दावे करत असलं तरी हरियाणा स्किल एम्प्लॉयमेंट कॉर्पोरेशन (HKRN) मध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या पदासाठी भरतीसाठी आलेल्या अर्जांवरून सुशिक्षित तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न किती गंभीर आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

हरियाणा स्किल एम्प्लॉयमेंट कॉर्पोरेशनने 6 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2024 या कालावधीत कंत्राटी सफाई कामगारांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. आश्चर्यकारक बाब म्हणजे 46 हजारांहून अधिक पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांनी कंत्राटी पद्धतीने स्वच्छता कर्मचारी होण्यासाठी अर्ज केले आहेत. 

5 हजार जागांसाठी 4 लाख अर्ज
सफाई कर्मचाऱ्यांच्या पाच हजार जागांसाठी एकूण 3.95 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात 1.2 लाख 12वी पास उमेदवारांसह सहा हजारांहून अधिक पदव्युत्तर आणि 40 हजार पदवीधरांचे अर्ज आहेत. 

लोडर पदासाठी तरुणांची गर्दी
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बेरोजगारीचं दर्शन घडवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एअर इंडियातर्फे एअरपोर्ट लोडर पदासाठी (Airport Loader) भरती ठेवण्यात आली होती. नोकरीची जहीरात देण्यात आली. पण 600 जागांसाठी 25 हजाराहून अधिक तरुणांची गर्दी केली होती. लोडरच्या नोकरीत विमानातून सामान उतरवण्याचं आणि चढवण्याचं काम असतं. प्रत्येक विमानातील सामान, कार्गो आणि इतर सामान उतरवण्यासाठी किंवा चढवण्यासाठी पाच ते सहा लोडर असतात. लोडरचा पगार 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत असतो. 

काही दिवसांपूर्वी गुजरातच्या भरुचमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एका खासगी कंपनीत 500 जागांसाठी भरती करण्यात येणार होती. यासाठी एका हॉटेलमध्ये मुलाखतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला. पण मुलाखत देण्यासाठी तरुणांची हजारोंनी गर्दी झाली. गर्दी अनियंत्रित झाली आणि धक्काबुक्की झाली. अखर गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आलं.