EVM ची बॅटरी जास्त चार्ज झाल्यामुळं काँग्रेसचा पराभव? निवडणूक आयोगानं स्पष्टच सांगितलं...

EVM Battery Issue: आहे ते असं आहे... ईव्हीएमची बॅटरी आणि चार्जिंगचं नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती आणि उभ्या राहिलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं.   

सायली पाटील | Updated: Oct 16, 2024, 07:17 AM IST
EVM ची बॅटरी जास्त चार्ज झाल्यामुळं काँग्रेसचा पराभव? निवडणूक आयोगानं स्पष्टच सांगितलं...  title=
EVM Battery Issue electronic controversy haryana election EC answered

EVM Battery Issue: निवडणुकांचा हंगाम सुरु झाला किंवा त्याची पूर्वतयारी सुरू झाल्यास कायमच चर्चा सुरू होते ती म्हणजे ईव्हीएम मशिनची. सत्ताधाऱ्यांकडून EVM मध्ये फेरफार झाल्याचे गंभीर आरोप सातत्यानं विरोधक करत असतात. अशाच काही आरोपांच्या धर्तीवर निवडणूक आयोगानंच काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

मंगळवारी निवडणूक आयोगानं (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणूक जाहीर केली. यानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान निवडणूक आयोगाच्या वतीनं (Election Commission) मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी हरियाणातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन अर्थात ईव्हीएमशी कथित स्वरुपात छेडछाड करण्यात आल्याचा काँग्रेस नेत्यांचा दावा फेटाळून लावला. काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार हरियाणामध्ये विविध बॅटरी क्षमता असणाऱ्या ईव्हीएमनं निवडणुकीचे विविध निकाल दिले होते. 

बॅटरीच्या क्षमतेनुसार निकालांवर होणाऱ्या परिणामाचा उल्लेख करत निवडणूक आयोगानं याआधीसुद्धा ईव्हीएमवर हॅकिंगचा आरोप झाल्याचा संदर्भ देत बॅटरीमुळं निकालात फेरफार झाल्याचं प्रकरण मात्र पहिल्यांदाच समोर आल्याचं म्हटलं. 'आता पुढे आणखी काय पाहायला मिळणार हे आम्हाला ठाऊक नाही. पण, काहीतरी नक्कीच समोर येईल', असं वक्तव्य राजीव कुमार यांनी केलं. 

दरम्यान, ईव्हीएमची बॅटरी ही नेमकी कशी असते हे सांगताना कुमार यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. ही बॅटरी एखाद्या कॅल्क्युलेटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीसारखी असते. मोबाईल बॅटरीप्रमाणं या बॅटरीला चार्ज करता येत नसून, त्यांचाही वापराचा ठराविक काळ असतो. CEC च्या माहितीनुसार मतदानाच्या दिवसापूर्वी साधारण 6 दिवस आधी ईव्हीएम सुरु केलं जातं आणि उमेदवारांची निवडणूक चिन्हं अपलोड केली जातात. त्याचवेळी मशिनला एक नवी बॅटरी जोडली जाते ज्यावर अधिकृत एजंटची स्वाक्षरी असते. 

हेसुद्धा वाचा : 'मोदींना बायको ना मुले, सर्व पाश त्यांनी तोडले पण...'; 'केनियाकडून शिका' म्हणत ठाकरेंच्या सेनेची टीका

 

ईव्हीएम आणि बॅटरीशी झालेली छेडछाड प्रकरणी चिंता व्यक्त करत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी  उत्तर देत, ईव्हीएम सोडाच, इथं तर बॅटरीवरही अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असतात असं स्पष्ट केलं. 

इतक्यावरच न थांता पेजरमध्ये स्फोट होऊ शकतात तर, ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं का? या सातत्यानं विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तरही निवडणूक आयोगाच्या वतीनं देण्यात आलं. पेजर नेटवर्कशी जोडलं असून, ईव्हीएमला तशी सुविधा नसते, त्यामुळं इथं हा प्रश्न उदभवत नाही. निवडणूक आयोगाच्या एकंदर माहितीनुसार काँग्रेसच्या पराभवामागं ईव्हीएम मशिनच्या बॅटरीचा मुद्दा नसू शकतो हेच स्पष्ट होत आहे.