Exit Poll : देशातील 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पूर्ण झालं आहे. 10 मार्चला 5 ही राज्यांमधील निवडणुकांचा निकाल लागणार आहे. पण आज मतदान संपताच विविध एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनंतर शक्यतांच्या जोरावर सगळेच पक्ष आता एक्टीव्ह झाले आहेत.
यूपीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न
उत्तर प्रदेशमध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील 54 जागांसाठी आज मतदान पार पडले. मतदान संपताच देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं आता लक्ष लागून आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये कोणाचे सरकार बनणार आहे, याचे अचूक उत्तर 10 मार्च रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच मिळणार असलं तरी एक्झिट पोलमधून काही चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येण्याची शक्यता आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम आदमी पक्षाने समाजवादी पक्षाला पाठिंबा जाहीर केला होता. तर काँग्रेसने आम आदमी पक्षाच्या पाठिंब्याने पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आवाज उठवला आहे. इतकेच नव्हे तर निवडणुकीच्या निकालापूर्वीच आपल्या उमेदवारांना घोडेबाजारापासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने सुरक्षित जागा शोधण्यास सुरुवात केली आहे. यूपी, गोवा, मणिपूरमध्ये स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याबरोबरच, भाजप इतर शक्यतांवरही मंथन करत आहे.
पंजाबमध्ये राजकीय दावे
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण राज्यात पहिल्यांदाच दोन पाच पक्षांमध्ये थेट निवडणूक होत आहे. अशा स्थितीत एक्झिट पोलवरुन अंदाज बांधले जात आहेत. या सगळ्यात पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री राजिंदर सिंह भट्टल यांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला आम आदमी पक्षासोबत युती करण्याची गरज भासली तर ते करू, असा दावा त्यांनी शनिवारी केला होता.
उत्तराखंडमध्ये स्वबळावरील सरकारसाठी प्रयत्न
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल 10 मार्चला लागणार असले तरी सरकार स्थापनेसाठी आता हालचाली सुरु झाल्यात. स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांनी कसरत सुरू केली आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. काँग्रेसचे अनेक विजयी उमेदवार पक्षाच्या संपर्कात असून गरज पडल्यास या सर्वांना भाजपमध्ये आणले जाईल, असा दावा भाजपचे आमदार महेंद्र भट्ट यांनी केलाय.
गोव्यात काय होणार?
सर्वांच्या नजरा गोव्याकडे लागल्या आहेत, कारण मागच्या निवडणुकीसारखेच निकाल लागताना दिसत आहेत. 40 जागांच्या गोव्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे. परंतु आप, टीएमसी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि एमजीपी यांनी ज्या पद्धतीने निवडणूक लढवली आहे, ते पाहता गोव्याचे निकाल धक्कादायक ठरू शकतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण तरी देखील त्यांना सत्ता स्थापन करता आली नव्हती. भाजपने छोट्या पक्षासोबत सत्ता स्थापन केली होती.
मणिपूरमध्ये युती की आघाडी?
भाजपने पाच वर्षांपूर्वी मणिपूरमध्ये 21 जागा जिंकल्या आणि एनपीपी आणि नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) यासह विविध पक्षांसह युतीचे सरकार स्थापन केल्यानंतर प्रथमच राज्यात सत्तेवर आले. यावेळी तिघेही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. त्याच वेळी, काँग्रेसने 2017 पर्यंत सलग 15 वर्षे राज्यात राज्य केले, ते चार डावे पक्ष आणि जनता दल-सेक्युलर यांच्यासोबत आघाडी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. राज्यात दोन टप्प्यात निवडणुका झाल्या असून 10 मार्च रोजी निकाल लागणार आहेत. गेल्या वेळी भाजपने काँग्रेसचे आमदार सोबत घेतले होते आणि यावेळीही ते एकमेकांच्या आमदारांवर लक्ष ठेवून आहेत. अशा स्थितीत मणिपूरमधील निवडणुकीचे निकाल काय लागतात हे पाहावे लागणार आहे.