भारतात कोरोनाचा समूह संसर्ग अटळ; ICMR मधील तज्ज्ञांची केंद्रावर टीका

कोरोनाची संपूर्ण परिस्थिती हाताळताना सरकारने साथरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या मताला विशेष किंमत दिली नाही. 

Updated: May 31, 2020, 12:36 PM IST
भारतात कोरोनाचा समूह संसर्ग अटळ; ICMR मधील तज्ज्ञांची केंद्रावर टीका

नवी दिल्ली: देशातील लॉकडाऊन उद्यापासून शिथील Unlock 1 करण्याची तयारी सुरु असतानाच देशातील काही प्रमुख डॉक्टरांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सरकारने COVID 19 ची परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही. त्यामुळे देशात कोरोनाचा समूह संसर्ग community transmission होणे अटळ असल्याचा इशारा या तज्ज्ञांनी दिला आहे. 

कोरोनाची संपूर्ण परिस्थिती हाताळताना सरकारने साथरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या मताला विशेष किंमत दिली नाही. त्यामुळे भारतातील कोरोनाचे संकट नियंत्रणात येईल, ही अपेक्षा अवाजवी आहे. उलट समाजातील अनेक स्तरांवर आणि लोकसंख्येत समूह संसर्ग community transmission होणे जवळपास निश्चित आहे, असे या डॉक्टरांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन आणि इंडियन असोसिएशन ऑफ एपिडमिलॉजिस्ट या संस्थांनी संयुक्तपणे हे पत्रक प्रसिद्ध केले आहे. 

लॉकडाऊन ५ : प्रवास आणि वस्तूंच्या ने-आण करता 'हे' नियम

मात्र, केंद्र सरकारच्या मते देशात अद्याप समूह संसर्ग community transmission झालेला नाही. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या शनिवारपर्यंत १,७३, ७६३ इतकी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने विक्रमी भर पडत आहे. मात्र, एक्टिव्ह रुग्णांची active cases संख्या ८९,९८७ वरुन ८६,४२२ वर आल्याचे केंद्राचे म्हणणे आहे.

धोका वाढतोय, २४ तासांत देशभरात कोरोनाचे ८३८० नवे रुग्ण
 
मात्र, या पत्रकात केंद्राचा हा दावा खोडून काढण्यात आला आहे. देशात २५ मार्च ते ३० जून या काळात लॉकडाऊन होता. या काळात सरकारकडून अत्यंत कठोर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, तरीही या काळात कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव झाला. अत्यंत वाईट परिस्थितीचा विचार करुन काही संस्थांचे अनुकरण करत लॉकडाऊनचे हे मॉडेल राबवण्यात आले होते. परंतु, सध्याची परस्थिती पाहता ते पूर्णपणे फसल्याचे दिसत आहे. या काळात सरकारने कोरोनाची अधिक जाण असलेल्या साथरोग तज्ज्ञाचा सल्ला घेतला का? किंबहुना ते अधिक उचित ठरले असते, असे या पत्रकात म्हटले आहे. या पत्रकावर एम्स रुग्णालयाच्या कम्युनिटी मेडिसीन सेंटरचे प्रमुख डॉ. शशी कांत, BHU च्या कम्युनिटी मेडिसीन विभागाचे माजी प्रमुख डॉ. डी.सी.एस रेड्डी यांचा समावेश आहे. हे दोघेही  ICMR रिसर्च ग्रुपचे सदस्य आहेत.