नवी दिल्ली : मोदी सरकारने आता सर्व चारचाकी (Four Wheelers) वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्ट टॅग’ (fast tag) अनिवार्य केलाय. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढले आहे. ज्यामध्ये १ जानेवारीपासून सर्व चार चाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ अनिवार्य करण्यात आलाय.. विशेष म्हणजे हा नियम १ डिसेंबर २०१७ च्या अगोदर खरेदी झालेल्या वाहनांसाह M आणि N कॅटेगिरीतील वाहनांना देखील लागू असणार आहे.
विना फास्टटॅग वाहनांनी फास्टटॅग मार्गिकेचा वापर केला तर वाहनांना दुप्पट टोल आकारण्यात येतो. देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवर टोलनाक्यांवर फास्टटॅग लेन सुरू झालंय. या योजनेमुळे टोलनाक्यातून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस आणि झटपट होतो.
सुरुवातीला टोल नाक्यांवरील ७५ टक्के मार्गिकांवरच ही योजना असेल, तर उर्वरित मार्गिकांवर टोल भरण्यासाठी रोख रक्कमेची सुविधा असणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
वाहनावर फास्टटॅग बसवण्यात आल्यानंतर टोलनाक्यावर येताच तेथील सुसज्ज अशा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशनद्वारे टोलनाक्यांवर बसवण्यात आलेले सेन्सर वाहनावरील टॅग वाचेल व टोलचे पैसे वाहनधारकाच्या खात्यातून जातात. पैसे खात्यातूच जाताच वाहनधारकाला नोंदणी असलेल्या मोबाइल क्रमांकावर त्याची माहिती मिळते
फास्टटॅग लावलेल्या वाहनांना टोलच्या रांगेत थांबण्याची गरज लागत नाही. फास्टटॅगचे विशिष्ट अकाऊंट तयार असेल त्यातून टोलचे पैसे आपोआप कट होणार आहेत. तसेच टोलनाक्यावर वाहनाची ओळखही होणार आहे. यातील रक्कम संपल्यानंतर फास्टटॅगला पुन्हा रिचार्ज करावा लागणार आहे. टोल प्लाझावरच्या लांबच लांब रांगांमधून सुटका होणार आहे.