Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं निधन; भाजपचा चेहरा हरपला

Sushil Kumar Modi Passes Away: माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. ते कॅन्सरने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू होते. 

सुरभि जगदीश | Updated: May 14, 2024, 06:42 AM IST
Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं निधन; भाजपचा चेहरा हरपला title=

Sushil Kumar Modi Passes Away: बिहारमधील भाजपचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं निधन झालं आहे. सुशीलकुमार मोदी यांचं नाव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक घेतलं जातं. ते 72 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुशील कुमार मोदी गेल्या काही काळापासून कॅन्सरच्या आजाराशी झुंज देत होते. बिहारचे सध्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. यावेळी त्यांनी सुशील कुमार मोदी यांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. ते कॅन्सरने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू होते. लोकसभा निवडणूक 2024 ची घोषणा होण्यापूर्वीच सुशील कुमार मोदी यांनी मीडियामध्ये या आजारपणाबाबत खुलासा केला होता.

कॅन्सरग्रस्त असल्याची स्वतः दिली होती माहिती

सुशील मोदी गेल्या सहा महिन्यांपासून कॅन्सरने ग्रस्त होते. त्यांनी 3 एप्रिल रोजी त्यांच्या एका एक्स-पोस्टमध्ये स्वतःला कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती. त्यांच्या निधनाची माहिती बिहारचे विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दिली. सुशील कुमार मोदी यांचा जन्म 5 जानेवारी 1952 रोजी बिहारची राजधानी पाटणामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल मोदी आणि आईचे नाव रत्ना देवी होते. 

सुशील कुमार मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. 1990 साली ते राजकारणात आले. 1990 मध्ये ते बिहार विधानसभेत पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. यानंतर 1995 आणि 2000 मध्येही ते आमदार झाले. ते सलग तीन वेळा आमदार होते. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भागलपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र एका वर्षातच त्यांनी राजीनामा दिला आणि पुन्हा बिहारच्या राजकारणात परतले.