Amritpal Singh Video: खलिस्तानी (Khalistani) समर्थक अमृतपाल सिंग (Amritpal Singh) हा गेल्या 12 दिवसांपासून पोलिसां चकमा देत असताना एक व्हिडीओ समोर आला आहे. अमृतपाल सिंगने व्हिडीओत आपण फरार असण्याला दुजारो दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, परदेशातून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. तसंच हा व्हिडीओ दोन दिवस जुना आहे. युकेमधील हँडलवरुन अमृतपालचा व्हिडीओ पाठवण्यात आला आहे.
"मी देशातील आणि परदेशातील सर्व शिखांना बैसाखीच्या दिवशी सरबत खालसा कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करतो. अनेक दिवसांपासून आपला समाज छोट्या-छोट्या मुद्द्यांवर मोर्चे काढण्यात मग्न आहे. जर आपल्याला पंजाबच्या समस्या सोडवायच्या असतील तर एकत्र यावं लागेल. ज्याप्रकारे सरकारने आपली फसवणूक केली आहे, ते लक्षात ठेवावं लागेल. अनेक कॉम्रेड्सना अटक करण्यात आली असून एनएसए लादलं आहे. अनेक कॉम्रेड्सना आसाममध्ये पाठवलं आहे. त्यामुळेच मी सर्व शिखांना बैसाखीच्या निमित्ताने एकत्र येण्याचं आवाहन करतो," असं अमृतपाल सिंगने म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्याने पोलिसांनी आपल्या केसालाही धक्का लावू शकत नाही असं आव्हनच दिलं आहे.
अमृतपाल सिंग आत्मसमर्पण करण्यासाठी पंजाबमध्ये परतला असल्याचा दावा केला जात असतानाच हा व्हिडीओ समोर आला आहे. शिखांसाठी वेगळ्या खलिस्तानची मागणी करणाऱ्या अमृतापल सिंगने गेल्या महिन्यात पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर आहेत. मात्र अमृतपाल सिंग पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढत आहे.
अमृतपाल सिंग आणि त्याचे सहकारी होशियारपूरमध्ये लपून बसले असल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. दरम्यान पोलीस पोहोचल्याची माहिती मिळताच अमृतपाल सिंग आणि त्याचे सहकारी गुरुद्वाराजवळ आपली वाहनं सोडून फरार झाले होते. यानंतर संपूर्ण परिसर सील करत सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. पोलिसांनी चेकपोस्ट आणि बॅरिकेड्स उभारलेले असतानाही अमृतपाल सिंग पुन्हा एकदा फरार झाला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमृतपाल सिंग एका आंतरराष्ट्रीय प्रसामाध्यमाला आत्मसमर्पण करण्याआधी मुलाखत देण्याचा विचार करत होता. पण आपल्याकडे पळून जाण्याची कोणतीच संधी नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने यात बदल केला. दुसरीकडे 1980 च्या पंजाब बंडाच्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर पंजाब पोलिसांसमोर अमृतपाल सिंग आणि त्यांच्या समर्थकांना अटक करण्यासाठी प्रचंड दबाव आहे. 1980 च्या बंडात हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते.
18 मार्चपासून पोलीस अमृतपाल सिंगचा शोध घेत आहे. पोलिसांकडून अमृतापलची संघटना 'वारिस पंजाब दे'च्या सदस्यांचाही शोध घेतला जात आहे. पण पोलिसांनी सतत अपयश येत आहे.
अमृतपाल सिंग आणि त्याच्या समर्थकांनी सहकाऱ्याची सुटका करण्यासाठी पोलीस स्टेशनवर हल्ला केल्यापासून पोलीस त्याला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत. 18 मार्चला वाहनांची अदलाबदली करत अमृतपालने पोलिसांना गुंगारा दिला. याशिवाय तो वारंवार वेशभूषेतही बदल करत आहे.