भारताकडूनच सीमोल्लंघन; चीनचा उलट आरोप

घटनेची माहिती मिळताच... 

Updated: Jun 16, 2020, 02:02 PM IST
भारताकडूनच सीमोल्लंघन; चीनचा उलट आरोप   title=
छाया सौजन्य- एएनआय

लेह : भारत India आणि चीन China या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सोमवारी रात्रीच्या सुमारास गलवान खोऱ्यामध्ये #GalwanValley या दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाल्याचं वृत्त मंगळवारी समोर आलं. या चकमकीमध्ये भारतीय सैन्यदलातील तिघांना आपले प्राण गमवावे लागल्याचं म्हटलं गेलं. ज्यामध्ये दोन जवान आणि एका अधिकाऱ्याचा समावेश असल्याची माहिती समोर आली.

दोन्ही देशांमध्ये सीमा प्रश्नावरुन सुरु असणारं चिंतेचं वातावरण आणि त्यामागोमाग आता झालेली चकमक पाहता चीनकडून याबाबतचं उत्तर देण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे हे उत्तर देत असताना चीननं भारतावर खळबळजनक आरोप केला आहे. 

'एएफपी न्यूज'चा हवाला देत 'एएनआय' या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार भारताकडूनच सीमा ओलांडत चीनच्या सैनिकांवर प्रथन हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. चीनच्या या गंभीर आरोपानंतर आता भारताकडून त्यावर काय उत्तर दिलं जातं किंवा कोणती कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारत- चीन सीमेवर चीनच्या सैन्याकडून सुरु असणाऱ्या सर्व हालचाली पाहता चीनकडून करण्यात आलेल्या या आरोपांमध्ये नेमकं किती तथ्य आहे, हासुद्धा प्रश्न उपस्थित होत हे. एकंदरच चीनी सैन्याचे मनसुबे आणि त्यांच्या हालचाली पाहता, सोमवारी रात्री झालेल्या या चकमकीमागचं मुख्य कारण समोर आणण्यासाठीच आता भारतीय लष्कर आणि संबंधित अधिकारी प्रयत्नांत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

सदर घटनेची माहिती समोर येताच भारतीय संरक्षण दलांमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्याचं दिसून आलं. ज्यामध्ये सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची आणि परराष्ट्र मंत्र्यांची बैठक घेतली. ज्यामध्ये पूर्व लडाखमध्ये सुरु असणाऱ्या या हालचालींवर प्रकाशझोत टाकण्यात आला असून, काही महत्त्वाच्या मुद्द्यायांवर चर्चा झाली.