उन्नावमधील पीडितेवर आज अंत्यसंस्कार

उन्नाव बलात्कार पीडित तरुणीला आज तिच्या गावात अंतिम निरोप दिला जाणार आहे. 

Updated: Dec 8, 2019, 07:54 AM IST
उन्नावमधील पीडितेवर आज अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार पीडित तरुणीला आज तिच्या गावात अंतिम निरोप दिला जाणार आहे. दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला होता. शनिवारी रात्री तिचं पार्थीव उन्नावमध्ये नेण्यात आलं. विशेष म्हणजे तिच्या पार्थीवाची समाधी केली जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने पीडितेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर देण्याची घोषणा केली आहे. ५ डिसेंबरला ५ आरोपींनी पीडितेवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता.

जिवंत जाळल्यानंतर ४० तास ती मृत्यूशी झुंजत होती. आधी कानपूरला, तिथून लखनौ आणि शेवटी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तिला हलवण्यात आलं. 

या प्रवासात ती भावाला एकच गोष्ट वारंवार सांगत होती. त्या नराधमांना सोडू नका. तिला जगायचं होतं, त्यांना फासावर लटकलेलं पाहायचं होतं. पण दुर्दैवानं शुक्रवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी तिची झुंज संपली. अन्यायाविरुद्ध लढणारा तिचा आवाज कायमचा बंद झाला.