Transgender Marriage: दोन मैत्रिणींच्या मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. या प्रेमाला त्यांनी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकवण्याचा निर्णय घेतला. यासाठी दुसऱ्या मैत्रिणिने लिंग परिवर्तन केले. इंदूरमध्ये महिलेपासून पुरुष बनलेल्या तरुणाने लग्न केले आहे. देशातील ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये ट्रान्सजेंडर विवाहाला कायदेशीर मान्यता दिली होती. यानंतर गुरुवारी इंदूरमध्ये महिलेचा पुरुष बनलेल्या तरुणाने विशेष विवाह कायद्यांतर्गत तरुणीशी लग्न केले.
अलकापासून अस्तित्त्व बनलेल्या तरुणाने आस्था नावाच्या तरुणीसोबत विवाह केला. या दोघांनी विवाहाचा निर्णय घेतल्यानंतर कोर्ट मॅरेज करायचे ठरवले. विशेष म्हणजे या दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी विवाहाला विरोध केला नाही. दोन्हीकडून मिळून 25 जण या विवाहात सहभागी झाले होते. गेल्यावर्षी, तिच्या 47 व्या वाढदिवशी अलकाने शस्त्रक्रिया करून तिचे लिंग स्त्रीपासून पुरुषात बदलले. यानंतर त्याने आपले नाव बदलून अस्तित्व असे ठेवले.
अस्तित्वाचा विवाह आस्थाशी झाला. जी त्याच्या बहिणीची मैत्रिण आहे. आस्थाला सुरुवातीपासूनच या बदलाची जाणीव होती. अस्तित्वने कधीच तिला अंधारात ठेवले नाही. अलकापासून अस्तित्व बनण्याची संपूर्ण प्रक्रिया त्याने आस्थाला आली.
आम्ही खूप विचार करून लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनाही यात काही अडचण नव्हती. यानंतर दोघांनीही आपली माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी रोशन राय यांना सांगितली आणि लग्नासाठी अर्ज केल्याचे आस्थाने सांगितले.
विशेष विवाह कायदा सर्व धर्मांना लागू होतो. या कायद्यानुसार, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध किंवा इतर कोणत्याही धर्मातील विवाह नोंदणी करण्यासाठी धर्म बदलण्याची गरज नाही. या कायद्याद्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला हव्या त्या धर्मात किंवा जातीत विवाह करण्याचा घटनात्मक अधिकार देण्यात आला आहे. ट्रान्सजेंडर विवाहाचे प्रकरण हे विषमलैंगिक संबंधाचे स्वरूप असून त्याला कायदेशीर मान्यताही देण्यात यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार हा विवाह झाल्याचे सांगण्यात येत आहे.