गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर काळाच्या पडद्याआड

काही महिन्यांपूर्वी मनोहर पर्रिकर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते.

Updated: Mar 17, 2019, 09:48 PM IST
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर काळाच्या पडद्याआड title=

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी संध्याकाळी पणजी येथील निवासस्थानी निधन झाले. कालपासून मनोहर पर्रिकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात होते. गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. मात्र, आज सकाळपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. अखेर ही भीती खरी ठरली असून काही वेळापूर्वीच मनोहर पर्रिकर यांची प्राणज्योत मालवली. 

काही महिन्यांपूर्वी मनोहर पर्रिकर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. यानंतर ते उपचारांसाठी अमेरिकेला गेले होते. उपचार घेऊन भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतली होती. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांच्या प्रकृतीत अनेकदा चढउतार पाहायला मिळाले होते. परंतु तरीही पर्रिकर यांनी नेटाने आपले काम सुरु ठेवले होते. मध्यंतरी त्यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्पही सादर केला होता. अनेकांनी पर्रिकरांच्या या दांडग्या इच्छाशक्तीचे कौतुकही केले होते.

दरम्यान, मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने शनिवारीच भाजप सरकार अस्थिर असल्याचे सांगत राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला होता. यानंतर दिल्लीत भाजपकडून चक्रे फिरायला सुरुवात झाली आहे. आज सकाळीच भाजपच्या निवडणूक समितीची बैठक पार पडली. तेव्हापासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दिगंबर कामत हे सध्या दिल्लीत असून ते भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचे समजते. २००५ साली कामत भाजपा सोडून काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. २००७ ते २०१२ या काळात त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्रीपदही भुषवले होते.

स्वच्छ प्रतिमा आणि साध्या राहणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पर्रिकर यांनी २००० ते २००५, २०१२ ते २०१४ आणि १४ मार्च २०१७ पासून निधनापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून गोवा राज्याची धुरा सांभाळली. २०१४ ते २०१७ दरम्यान त्यांनी संरक्षण मंत्रिपद सांभाळले.