नवी दिल्ली: देशातील चलनी नोटांवर देवी लक्ष्मीची प्रतिमा छापली तर आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपया मजबूत होईल, असा अजब दावा भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. ते मंगळवारी मध्यप्रदेशात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी एका पत्रकाराने इंडोनेशियाच्या चलनी नोटांवर गणपतीची प्रतिमा असल्याचे स्वामी यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर उत्तर देताना स्वामी यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात. मी या निर्णयाच्या बाजूने आहे. कारण, गणपती सर्व विघ्न दूर करतो. त्यामुळे भारतीय चलनी नोटांवरही देवी लक्ष्मीची प्रतिमा छापावी. जेणेकरून भारतीय रुपया मजबूत होईल. याबद्दल कोणीही वाईट वाटून घ्यायचे कारण नाही, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी भारताच्या लोकसंख्या वाढीसंदर्भातही भाष्य केले. भारतामधील लोकसंख्या वाढली तरी समस्या उद्भावण्याचे कारण नाही. या लोकसंख्येचा उत्पादन वाढवण्यासाठी योग्यपणे वापर करुन घेतला पाहिजे. परंतु, त्यासाठी योग्य शिक्षणाची गरज असल्याचे स्वामी यांनी सांगितले.
गेल्या काही काळापासून केंद्र सरकार खालावणारा आर्थिक विकासदर आणि बेरोजगारीचे वाढते प्रमाण अशा दुहेरी समस्येचा सामना करत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ४.५ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. ही गेल्या सहा वर्षांतील निच्चांकी कामगिरी आहे.
याशिवाय, अन्य क्षेत्रांमध्येही मरगळ आली आहे. विशेषत: वाहननिर्मिती क्षेत्राला या मंदीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे वाहननिर्मिती क्षेत्रातील हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. मध्यंतरी केंद्र सरकारने कंपनी कर आणि परकीय गुंतवणुकीवरील निर्बंध शिथील करण्यासारख्या काही उपाययोजना करून पाहिल्या होत्या. मात्र, त्याचा विशेष फायदा झाला नव्हता.