पणजी : निवडणूक म्हटली की त्यात कोण कुणासमोर उभे ठाकेल हे सांगता येत नाही. या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर भाऊ, बहीण, सासू, सासरे, आई, वडील, नणंद, भावजय हि सारी नाती गोती विसरून एकमेकांविरोधात निवडणूक लढल्याची उदाहरणे काही कमी नाहीत.
वडिलांनी किंवा सासऱ्यांनी पक्षासाठी मेहनत करायची. निवडणुक जिंकायची. मतदार जोडायचे आणि त्यांच्या पुण्याईवर जावई किंवा मुलाने पुढे निवडणूक लढवायची, जिंकायची ही उदाहरणेही काही कमी नाहीत.
अशीच एक निवडणूक गोव्यात चर्चेत आहे. उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यातील पर्ये हा मतदारसंघ. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांचा हा पारंपरिक मतदारसंघ. मतदारसंघाच्या निर्मितीपासून येथून प्रतापसिंह राणे विजयी होत आले आहेत. यावेळच्या निवडणुकीतही काँग्रेसने राणे यांना उमेदवारी जाहीर केली.
उमेदवारी जाहीर झाल्यावर राणे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, अचानक त्यांनी या निवडणुकीत उडी घेऊन आपण राजकारणात सक्रीय असल्याचे दाखवून दिले. या मतदारसंघांमधून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करत त्यांनी प्रत्यक्ष प्रचाराला सुरवात केली आहे.
याचे कारण म्हणजे त्यांच्याविरोधात भाजपने दिलेला उमेदवार. गोव्यात भाजपचे सरकार असून प्रतापसिंह राणे यांचे चिरंजीव विश्वजित हे या सरकारमधील आरोग्यमंत्री आहेत. यावेळी भाजपने विश्वजित यांची पत्नी डॉ. दिव्या राणे यांना पर्ये मतदारसंघातून निवडणुकीत उतरवले आहे.
सून डॉ. दिव्या राणे यांची उमेदवारी जाहीर होताच सासरे प्रतापसिंह राणे यांनी पर्ये येथील भूमिका देवी मंदिरात नारळ चढवून प्रचाराला सुरवात केली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी विजयादेवी राणे, रणजित राणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतापसिंह राणे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या दोघानीही आपापली उमेदवारी कायम ठेवल्यास सासरे विरोधात सून अशी लढत होण्याची शक्यता आहे.
आम आदमी पक्षानेही येथून विश्वजित कृष्णराव राणे यांना उमेदवारी दिली आहे. ते ही त्या राणेंचे जवळचे नातेवाईक आहेत. एकाच मतदारसंघात तीन राणे ते ही जवळचे नातेवाईक रिंगणात आल्याने मतदार कुणाच्या पारड्यात आपली मते टाकणार याची उत्सुकता आहे.