Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात घट होत होती. मात्र, आज सोन्याच्या घसरणीवर ब्रेक लागला आहे. आतंरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात नरमाई दिसून आली आहे. तर, भारतात मात्र त्या उलट झाले आहे. आज 29 ऑगस्ट रोजी वायदे बाजारात सोनं-चांदीचे भाव वाढले आहेत. सराफा बाजारात सोन्याचे दर 74,300 रुपयांच्या आसपास आहेत. तर, कमोडिटी बाजारात सोनं 72,000 हजारांवर पोहोचले आहे.
आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गोल्ड फ्युचरमध्ये 242 रुपयांची तेजी दिसून आली होती. मौल्यवान धातुच्या किंमतीत 71,985 रुपये प्रति तोळावर व्यवहार होत होता. काल बुधवारी हा व्यवहार 71,743 वर स्थिरावला होता. या दरम्यान चांदीने 482 रुपयांची झळाळी घेतली आहे. आज चांदी 84,459 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे. तर काल चांदी 83,977 रुपयांवर स्थिरावली होती.
विदेशी बाजारातील कमजोर कल असूनही काही सौद्यांमुळं सोन्याचे भाव वधारले आहेत. राजधानी दिल्लीत बुधवारी सोन्याचा भाव 74,350 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. मात्र, चांदीचा भाव 400 रुपयांनी घसरून 87,800 रुपये किलो झाला होता. दरम्यान, ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भावही ७४,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिर राहिला. चांदीच्या दरात घसरण होण्यामागे औद्योगिक घटकांची मागणी आणि जागतिक स्तरावर होणारा परिणाम हीदेखील कारणे आहेत.
यूएस डॉलरमध्ये वाढ झाल्यामुळे बुधवारी सोन्याचे भाव थोडे गडगडले होते. इस्रायल-हिजबुल्लाह संघर्ष, राजकीय तणाव यामुळंही सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होत आहे.