UIDAI क्रमांकाच्या गोंधळानंतर गूगलचा माफीनामा

 गुगलनं या सगळ्या प्रकाराबाबत जाहीर माफी मागितलीय

Updated: Aug 4, 2018, 03:56 PM IST
UIDAI क्रमांकाच्या गोंधळानंतर गूगलचा माफीनामा

नवी मुंबई : भारतीय ग्राहकांच्या मोबाईलमधील संपर्क यादीत आलेल्या UIDAI नंबरचं गूढ उकललंय. गूगलच्या चुकीमुळे हा नंबर ग्राहकांच्या संपर्क यादीत आल्याचं आता स्पष्ट झालंय. देशातल्या कोट्यवधी ग्राहकांच्या मोबाईल फोन बुकमध्ये अचानक UIDAI म्हणून एक नंबर अॅड झाला होता. हा आधारचा हेल्पलाईन क्रमांक असल्याचे सांगण्यात येत होतं. 

आपोआप मोबाईलमध्ये आलेल्या या नंबरमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आणि संतापाचं वातावरण होतं. अखेर गूगलनं रात्री उशिरा यावर स्पष्टीकरण दिलंय. अॅन्ड्रॉईड सेटअपमधील तांत्रिक चुकीमुळे हा नंबर ग्राहकांच्या मोबाईलमध्ये आल्याचं स्पष्टीकरण गूगलनं दिलंय.

तसंच यामुळे ग्राहकांना झालेल्या नाहक मनःस्तापाबद्दल गुगलनं स्पष्टीकरण दिलंय. तसंच गुगलनं या सगळ्या प्रकाराबाबत जाहीर माफी मागितलीय. 

असा कुठलाही नंबर ग्राहकांच्या मोबाईलच्या फोनबुकमध्ये पाठवला नसल्याचा खुलासा करत ग्राहकांनी आपली कोणतीही माहिती कुणासोबत शेअर न करण्याचं आवाहन 'आधार'नं केलं होतं. त्यानंतर गूगलला माफीनामा सादर करावा लागला.