सरकारी कर्माचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वेळेआधीच पगार, बोनसही मिळणार

Government Jobs Salary : सरकारी खात्यात नोकरीला असणाऱ्या मंडळींना मिळणारं वेतन आणि शासनातर्फे या मंडळींना मिळणाऱ्या सुविधा इतक्या कमाल असतात की या मंडळींचा अनेकांनाच हेवा वाटतो.   

सायली पाटील | Updated: Aug 17, 2023, 09:17 AM IST
सरकारी कर्माचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वेळेआधीच पगार, बोनसही मिळणार  title=
Government Employees will get Advance Salary and pension

Government Employees: वेळोवेळी लागू होणारी पगारवाढ, नवनवीन वेतन आयोग, बहुविध भत्ते, अमाप सुट्ट्या आणि अनेक ठिकाणी मिळणाऱ्या सवलती... सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या एखाद्या विभागात नोकरीला असणाऱ्या मंडळींसाठी यातलं काहीच नवं नाही. पण, खासगी क्षेत्रातील मंडळींसाठी मात्र ही हेवा वाटणारी बाब. कारण, कागजोपत्री मोठी वाटणारी पगाराची रक्कम या मंडळींच्या हातात येते तेव्हा तिच्यावर बरीच कात्री मारलेली असते. थोडक्यात खासगी आणि सरकारी खात्यातील नोकऱ्यांमध्ये असणारा आणि कायमच चर्चेत येणारा हा एक विषय. यावेळी हा मुद्दा प्रकाशात येण्याचं निमित्त म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि त्यांचं निवृत्तीवेतन. 

सरकारच्या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना फायदा 

शासनाकडून काही राज्यातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पगार आणि पेंशन आगाऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. ओनम आणि गणेश चतुर्थी अशा सण- उत्सवांना केंद्रस्थानी ठेवत हा निर्णय घेतला गेला आहे. ऑगस्ट महिना संपण्याआधीच हा पगार आणि निवृत्ती वेतन कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Mhada Lottery 2023 : ऑक्टोबर महिन्यात म्हाडाच्या 10 हजार घरांची सोडत; आतापासूनच डाऊनपेमेंट तयार ठेवा 

कोणत्या कर्मचाऱ्यांना केव्हा मिळणार फायदा? 

केंद्र शासनाच्या माहितीनुसार केरळ आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी ही खास भेट असणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून 14 ऑगस्ट रोजी आगाऊ पगार आणि निवृत्तीवेतनासंदर्भातील अधिसूचनाही जारी करण्यात आली. जिथं ही रक्कम कर्मचाऱ्यांना केव्हा मिळेल हेसुद्दा स्पष्ट करण्यात आलं. 

महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांची चांदी 

महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा पगार 27 सप्टेंबरला जारी केला जाणार आहे. तर, निवृत्तीवेतनधारकांनाही या योजनेचा फायदा मिळणार आहे. जिथं त्यांना बँक किंवा पोस्टामार्फत ही रक्कम जारी केली जाईल. शासनाच्या अख्त्यारित येणाऱ्या इंडस्ट्रीयल कर्मचाऱ्यांसाठीसुद्धा मजुरीची रक्कम याच महिन्यात जारी करण्यात येईल. सर्व बँकांनी या निर्णयाच्या धर्तीवर संबंधित व्यक्तींच्या खात्यात लवकरात लवकर ही रक्कम पोहोचवावी अशा सूचना RBI कडून देशातील बँकांना करण्यात आल्या आहेत. 

फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर केरळातही शासनानं कर्मचाऱ्यांना ओनम सणाच्या निमित्तानं 4 हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. PTI या वृत्तसंस्थेतच्या माहितीनुसार जे कर्मचाऱी बोनससाठी पात्र नाहीत त्यांना 2750 रुपयांचा फेस्टीव्हल अलाऊंन्स देण्यात येणार आहे. तर, निवृत्तीवेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1000 रुपयांचा फेस्टिव्हल अलाऊंन्स देण्यात येणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही विचार शासनानं केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं केरळात नोकरदार वर्गात आनंदी आनंद पाहायला मिळणार आहे.