नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक आणि दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्याऱ्या युवानांना रोखण्यासाठी मोदी सरकारने आता एक नवीन योजना तयार केली आहे. मुख्य प्रवाहात या लोकांना आणण्यासाठी आणि आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार आमिर खानचा दंगल आणि सलमान खानचा बजरंगी भाईजान यांच्यासारखे सुपरहिट चित्रपट डीडी काश्मीरवर दाखवणार आहे. या दोन्ही चित्रपटांना राष्ट्रमुक्ती आणि देशाबद्दलच्या प्रेमाचा संदेश दिल्या बद्दल पसंती मिळाली होती.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार डीडी काश्मीरसाठी ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात येणार आहे. काश्मीरच्या लोकांसाठी खास कोण बनेगा काश्मीर का करोडपती आणि एक सिंगिंग रिअॅलिटी शो या चॅनेलवरही प्रसारित केला जाणार आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या काश्मीर दौ-यात सोमवारपासून या चॅनेलचा प्रसार सुरु होणार आहे. राजनाथ सिंग चार दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या वेळी ते समाजाच्या विविध विभागातील लोकांना भेटणार आहेत.
प्रसार भारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा प्रकल्प गृहमंत्रालयाच्या पुढाकाराने सुरु झाला आहे. अनेक महिन्यांपासून यावर काम करीत आहे. मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, "या मागचा हेतू मनोरंजनासोबतच लोकांना संदेश देणं आहे की घाटातील लोकांवर सरकार लक्ष देत आहे. डिसेंबरपासून या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे'.