नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे सॅनिटायझरचा काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे बाजारात सॅनिटायझरची मागणी वाढली असून दुकानांतील सॅनिटायझरचा साठा संपल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. सॅनिटायझरची मागणी भविष्यात आणखी मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक ठिकाणी साठेबाजी केली जात असल्याचे प्रकारही उघड झाले आहेत. त्यामुळे सरकारनं त्याची दखल घेत सॅनिटायझरची किंमत वाढवण्यास मज्जाव केला आहे.
केंद्राच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयानं सॅनिटायझरची किंमत वाढणार नाहीत असा आदेश काढला असून सॅनिटायझर स्वस्त उपलब्ध करून देण्याबाबत पावलं उचलली आहेत. देशात सॅनिटायझर ५ मार्चला ज्या किंमतीमध्ये उपलब्ध होते तीच किंमत पुढचे काही महिने कायम राहणार आहे.
सॅनिटायझर ५ मार्चला असलेल्या किंमतीतच ३० जूनपर्यंत कायम ठेवण्याचा आदेश केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयानं काढला आहे. काळाबाजार आणि किंमत वाढवण्याच्या घटना समोर आल्यानंतर काढलेल्या या आदेशामुळे लोकांना सॅनिटायझर माफक दरात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सॅनिटायझरचे दर न वाढवण्याचा सरकारचा आदेश अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरना लागू होणार आहे. सरकारनं अत्यावश्यक वस्तु अधिनियमानुसार किंमतीवर हे नियंत्रण लागू केले आहे. तसेच सॅनिटायझर बनवणाऱ्यांना परवाने देण्याची सूचनाही केंद्र सरकारनं राज्य सरकारांना केली आहे. सॅनिटायझरच्या पुरवठ्यावर विपरित परिणाम करणाऱ्या आणि काळाबाजार करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल असा इशाराही देण्यात आला आहे.