नवी दिल्ली : जीएसटीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. आज मध्यरात्री देशातली सर्वात मोठी आर्थिक सुधारणा लागू होईल. देशात वस्तू आणि सेवाकर लागू होणार आहे. या ऐतिहासिक क्षणी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशातल्या १०० नामदारांना बोलवण्यात आलंय.
गानसम्राज्ञी लता मंगेशकरांपासून महानायक अमिताभपर्यंत आणि उद्योगपती रतन टाटा ते ज्येष्ठ विधीज्ञ सोली सोराबजींपर्यंत... देशातल्या १०० बड्या आसामी आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बघयाला मिळणार आहेत... मध्यरात्री लॉन्च होणाऱ्या वस्तू आणि सेवा कराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी या सर्वांना निमंत्रण देण्यात आलंय.
रिझव्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल, माजी गव्हर्नर सी रंगराजन, बिमल जालान हेसुद्धा हजर राहणार आहेत... याशिवाय उद्योजकांच्या संघटना सीआयआय, फिक्की आणि असोचेमचे अध्यक्षही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
आतापर्यंत घोषित कार्यक्रमानुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान,लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा मंचावर असतील.
रात्री पावणे अकराच्या सुमारास कार्यक्रमाला सुरूवात होईल. त्यानंतर सुमारे १ तास २० मिनिटं कार्यक्रम होईल. त्यात साधारण १० मिनिटांची जीएसटीची फिल्मसुद्धा दाखवण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे २५ मिनिटांचं भाषण करतील.
या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचं निमंत्रण मेट्रो मॅन ई श्रीधनर, संघाचे विचारक एस गुरुमूर्ती, हरित क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामिनाथन, केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख वनजा सरण आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाचे सुशील चंद्रा यांनाही देण्यात आलंय.
या सर्वांच्या उपस्थितीत गेल्या ७० वर्षापासून लागू असणाऱ्या अप्रत्यक्ष करांच्या जंजाळात कोंडलेला देशाच्या अर्थव्यवस्थेचा श्वास काहीसा मोकळा होईल. काँग्रेससह सर्व प्रमुख विरोधीपक्ष मात्र यावेळी गैरहजर राहतील... त्यामुळे एका ऐतिहासिक घटनेला विरोधाचं गालबोल लागणार हे मात्र नक्की