नितीन पटेल यांची नाराजी दूर, मिळालं हे खातं

मनासारखं मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नाराजी दूर झाली आहे.

Updated: Dec 31, 2017, 09:37 PM IST
नितीन पटेल यांची नाराजी दूर, मिळालं हे खातं  title=

गांधीनगर : मनासारखं मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नाराजी दूर झाली आहे. नितीन पटेल यांना अर्थमंत्रालय परत देण्यात आलं आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी नितीन पटेल यांना पुन्हा एकदा अर्थमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं.

नितीन पटेल यांचं बंड थंडावल्यामुळे गुजरातमध्ये भाजपवर ओढवलेलं संकट टळलं आहे. मंत्रीमंडळामध्ये आवडीचं खात न मिळाल्यामुळे नाराज असलेले नितीन पटेल कार्यभार स्वीकारत नव्हते.

योग्यतेनुसार क्रमांक दोनचं मंत्रीपद देण्याचं आश्वासन अमित शहांनी दिल्यावर नितीन पटेल कार्यभार स्वीकारायला तयार झाले. याआधीच्या मंत्रीमंडळामध्ये नितीन पटेल यांच्याकडे अर्थमंत्रालयाबरोबरच शहर विकास मंत्रालयही होतं. पण आताच्या सरकारमध्ये पटेल यांना शहर विकास मंत्रालय मिळालं का नाही, याबाबत अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही.

या मंत्रीमंडळामध्ये पटेल यांना रस्ते, स्वास्थ्य, चिकित्सा, शिक्षण, नर्मदा यासारखी मंत्रीपदं देण्यात आली होती. तर अर्थ खातं सौरभ पटेल आणि शहर विकास मंत्रालय मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

ही मंत्रीपदं मिळाल्यामुळे नाराज झालेल्या पटेल यांनी बंड केलं होतं. हा मुद्दा मंत्रीपदाचा नसून आत्मसन्मानाचा आहे. मला सन्मानजनक खातं देण्यात यावं किंवा मंत्रीपदापासून मुक्त करण्यात यावं, अशी मागणी मी पक्षाकडे केली होती, असं पटेल म्हणालेत. १८२ जागांच्या गुजरात विधानसभेमध्ये भाजपचे ९९ आणि काँग्रेसचे ७७ आमदार निवडून आलेत.