कोर्टाच्या आदेशानंतर मध्यरात्रीच ज्ञानवापीत सुरु झाली पूजा; तब्बल 31 वर्षांनी घुमला शंखनाद

Gyanvapi Mosque : वाराणसी न्यायालयाच्या आदेशानंतर तळघरातून रात्रभर बॅरिकेड्स हटवण्यात आले. यानंतर पहाटेपासूनच पूजेसाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे.

आकाश नेटके | Updated: Feb 1, 2024, 10:55 AM IST
कोर्टाच्या आदेशानंतर मध्यरात्रीच ज्ञानवापीत सुरु झाली पूजा; तब्बल 31 वर्षांनी घुमला शंखनाद title=

Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिदीच्या आवारात बुधवारी रात्री पूजा करण्यात आली. कोर्टाच्या आदेशानंतर 24 तासांच्या आत वाराणसी जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्री उशिरा बॅरिकेड्स हटवले आणि ज्ञानवापी मशिदीच्या व्यासजी तळघरात पूजा सुरू करण्यात आली. बुधवारी रात्री दीडच्या सुमारास जिल्हा प्रशासनाने व्यासजींचे तळघर उघडले. त्यानंतर दोन वाजण्याच्या सुमारास पहिली पूजा करण्यात आली. यानंतर गुरुवारी सकाळी मंगला आरतीही करण्यात आली. पूजेला सुरुवात झाल्यानंतर सकाळपासूनच भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

31 वर्षांनंतर बुधवारी रात्री उशिरा रात्री उशीरा ज्ञानवापी येथील व्यास तळघरात मूर्तींची पूजा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त उपस्थित होते. रात्रीच्या सुमारास दीपप्रज्वलन करून गणेश-लक्ष्मीची आरती करण्यात आली. तळघराच्या भिंतीवरील त्रिशूलासह इतर धार्मिक प्रतिकांचीही पूजा करण्यात आली. व्यासजींच्या तळघरात, विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओमप्रकाश मिश्रा आणि गणेशवर द्रविड यांनी पूजा केली. मंगला गौरीचीही विधीनुसार पूजा  करण्यात आली. नोव्हेंबर 1993 मध्ये इथे पूजा थांबवण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले होते. त्यानंतर वाराणसी कोर्टानं बुधवारी हिंदू पक्षाला व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली. यानंतर रात्रीच बॅरिकेडिंग हटवून पूजेची व्यवस्था करण्यात आली.

बुधवारी ज्ञानवापी प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने मोठा निर्णय दिला. न्यायालयाने व्यास कुटुंबीयांना संकुलाच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली. हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, व्यासजींच्या तळघरात पूजा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर काशी विश्वनाथ ट्रस्ट अंतर्गत तळघरात पूजा करण्यात आली.

हिंदू पक्षाने व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी मागितली होती, जी न्यायालयाने मान्य केली. सोमनाथ व्यास यांचे कुटुंब 1993 पर्यंत या तळघरात पूजा करत होते. 1993 मध्ये तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशानंतर तळघरातील पूजा बंद करण्यात आली. मात्र, व्यास कुटुंबीय अनेक दिवसांपासून येथे पुन्हा पूजा करण्याची परवानगी मागत होते. बुधवारी कोर्टाने आदेश देतात तिथले बॅरिकेड हटवण्यात आले आणि मध्यरात्री पूजा करण्यात आली.

दरम्यान, वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर मुस्लिम पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे मुस्लिम पक्षाने म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे मुस्लिम पक्षानेही एएसआय सर्वेक्षण नाकारले होते.