नवी दिल्ली : निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी पवन जल्लाद तिहार कारागृहात पोहोचला. त्याचवेळी दिल्ली न्यायालयाने फाशी संदर्भातला निर्णय दिला आहे. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार होती. मात्र आज दिल्ली न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत निर्भयाच्या दोषींची फाशी न देण्याचा निर्णय दिला आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. दरम्यान, आज पवन जल्लादने डमी फाशीचा सराव देखील केला आहे.
निर्भया केसमधील दोषींना फाशी देण्यासंदर्भात ब्लॅक वॉरंट १ फेब्रुवारीचे निघालं होते. मात्र चौघांपैकी एक दोषी असेलेल्या विनयने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली. त्यामुळे फाशीची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र नियोजीत कार्यक्रमानुसार दोषींना फासावर लटकवण्यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली होती.
#WATCH Asha Devi, mother of the 2012 Delhi gang-rape victim: The lawyer of the convicts, AP Singh has challenged me saying that the convicts will never be executed. I will continue my fight. The government will have to execute the convicts. pic.twitter.com/VynpcSLhyp
— ANI (@ANI) January 31, 2020
निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची तयारी पूर्ण झाली होती. त्याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले होते, असे तिहार तुरुंग प्रशासनाने स्पष्टही केले होते. मात्र फाशी पुढे ढकलण्यासंदर्भात पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तिहार तुरुंग प्रशासनाच्यावतीने इरफान अहमद पटियाला हाऊस कोर्टात हजर झाले.
निर्भया प्रकरणातील चारपैकी विनय शर्माची याचिका प्रलंबित आहे. इतर तिघांना फाशी दिली जाऊ शकते. विनय शर्माच्या प्रकरणाचा अपवाद वगळता इतर कोणतेही प्रकरण न्यायप्रविष्ट नाही. या याचिकेवर सुनावणी सुरु असताना दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ज्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
१६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा अत्यंत क्रूर पद्धतीने लैंगिक छळ करण्यात आला. या अत्याचारामुळे निर्भयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती.