Har Ghar Tiranga: देशभरात दररोज लाखो 'तिरंग्या'ची निर्मिती', तब्बल 'इतक्या' कोटींची उलाढाल

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने देशात 'हर घर तिरंगा' हे अभियान राबवलं जातंय

Updated: Aug 13, 2022, 09:02 PM IST
Har Ghar Tiranga: देशभरात दररोज लाखो 'तिरंग्या'ची निर्मिती', तब्बल 'इतक्या' कोटींची उलाढाल title=

Har Ghar Tiranga: देश स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करत असून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा होत आहे. भारत सरकारने 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवलं जात आहे. आजपासून 15 ऑगस्टपर्यंत ही मोहिम सुरु रहाणार आहे.

सरकारच्या अभियानामुळे यावर्षी तिरंग्याच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या अभियानाचा ध्वज बनवणाऱ्या उद्योगाला मोठा फायदा होत आहे. यावर्षी साधारण 25 ते 30 कोटी ध्वजांची विक्री होण्याची शक्यता आहे. 

पॉलिस्टर आणि मशीनपासून बनवलेल्या ध्वजांना मान्यता
केंद्र सरकारने यंदा पॉलिस्टर आणि मशीनपासून बनवलेले ध्वज फडवकवण्याची मान्यता दिली आहे. ध्वज बनवण्याची सर्वाधिक ऑर्डर गुजरात इथल्या सुरतमधल्या व्यावसायिकांना मिळाली आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी 15 ऑगस्टपर्यंत 200 ते 250 कोटींच्या तिरंग्यांची विक्री होते. मात्र यंदा विक्रीचा हा आकडा 500 ते 600 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

सुरतमधल्या व्यापाऱ्यांना यंदा 10 कोटी ध्वज बनवण्याची ऑर्डर मिळाली आहे. याआधी ध्वज खादीच्या कपड्यापासून बनवला जात होता. पण आता भारतीय ध्वज संहिता बदलून सरकारने पॉलिस्टर आणि मशीनपासून ध्वज बनवण्यास मान्यता दिली आहे. हे पाहता अनेक व्यापाऱ्यांनीही पहिल्यांदाच पॉलिस्टपासून तिरंगा बनवण्याचं काम सुरू केलं आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून या व्यापाऱ्यांना ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. सरकारी ऑर्डरचे झेंडे 16x24 आणि 20x30 इंच लांबी-रुंदीचे आहेत, ज्यांची किंमत 20 ते 35 रुपये इतकी आहे. 

दिल्लीतल्या व्यापाऱ्यांकडेही ऑर्डर वाढली
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिल्लीतल्या व्यापाऱ्यांकडेही यंदा तिरंगा बनवण्याची ऑर्डर वाढली आहे. दिल्लीत साधारण 4 ते 5 कोटी ध्वज विक्री होण्याची शक्यता आहे. याआधी स्वातंत्र्य दिनी केवळ 40 ते 50 लाख ध्वजांची विक्री होत होती. दिल्लीतल्या छोट्या-छोट्या व्यापाऱ्यांनाही जवळपास 10 लाख ध्वज बनवण्याची ऑर्डर मिळाली आहे. 

महाराष्ट्रसह अनेक राज्यात व्यापार तेजीत
सुरत आणि दिल्लीशिवाय, महाराष्ट्र, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, तामिळनाडू, ओडिसा, बिहार, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातही मोठ्या प्रमाणावर तिरंगा तयार करण्याचं काम वेगाने सुरु आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा पोहोचवला जात आहे. 

पीएम मोदींनी केली होती घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जुलैला 'हर घर तिरंगा' अभियानाची घोषणा केली होती. तेव्हापासून तिरंग्याच्या विक्रित 50 पट वाढ झाली आहे.