Mumbai Metro Project Update: मुंबईत मेट्रो प्रकल्पाचे जाळे पसरत आहे. मेट्रोमुळं वाहतुक कोंडी तर कमी होईलच पण प्रवाशांचा वेळदेखील वाचणार आहे. मुंबईप्रमाणेच ठाण्यातही मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. अंतर्गत ठाणे मेट्रो प्रकल्पाला मागील वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिली होती. आता या मेट्रोचे काम सुरू आहे. पुढील पाच वर्षात हा प्रकल्प सुरू होणार असल्याची शक्यता आहे.
ठाण्यात मेट्रो मार्ग 4 आणि 5 असे दोन प्रकल्प सुरू आहेत. हे दोन्ही मार्ग एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. तसा एमएमआरडीएचा मानस आहे. मेट्रोची काही स्थानकेही मेट्रो चार आणि पाचला जोडली जाणार आहेत. तसंच, मेट्रो मार्गाची जोडणी थेट लोकलला देखील करण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांना थेट मेट्रो मार्गाने प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर त्यामुळं लोकलमधील गर्दीदेखील कमी होणार आहे.
मेट्रो रिंग रोड प्रकल्प 29 किमी लांबीच्या या प्रकल्पात 26 किमी लांबीचा मार्ग हा उन्नत असून तीन किमीचा मार्ग भूमिगत आहे. यात 22 स्थानके असणार आहेत. त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. त्यातीलच एक भूमिगत स्थानक थेट ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड आणि ठाण्याच्यामध्ये बांधण्यात येणाऱ्या नवीन ठाणे स्थानकाला मेट्रोचे स्थानक जोडले जाणार आहेत.
मेट्रो ही ठाणे स्टेशन, नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट इत्यादी भागांतून जाणार आहे. त्यामुळं नागरिकांना व व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे. या भागातील नागरिकांना स्टेशनवर पोहोचणेही फायद्याचे ठरणार आहे. ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पासाठी 2029 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तसंच, हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर अंदाजे 7.31 लाख प्रवाशांना या मेट्रो रेल्वे सेवेचा लाभ होणार आहे. हा प्रकल्प ठाण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ठाण्यातील वाढती वाहतूक कोंडीवर या प्रकल्पामुळं थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
ठाणे हे सर्वात व्यस्त स्थानक आहे. ट्रान्सहार्बर आणि मध्य रेल्वेचे मार्गदेखील ठाणे स्थानकात जोडले जातात. त्यामुळं या स्थानकात नेहमीच अधिक गर्दी असते. या मेट्रोमुळं ठाणे स्थानकातील गर्दी विभागली जाणार आहे. त्यामुळं प्रवाशांचा लोकल प्रवासदेखील सोप्पा होणार आहे.