अहमदाबाद : गुजरातमधील सर्व बंदरांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानी कमांडो समुद्रामार्गे भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा दिलाय. कच्छ परिसरातून घुसखोरी केली जाण्याची शक्यताय. तटरक्षक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाकिस्ताननं प्रशिक्षण दिलेल्या कमांडोंनी हरामी नाला खाडी क्षेत्रातून कच्छ भागात प्रवेश केला आहे. त्यांना पाण्यामधून हल्ला करण्याचंही प्रशिक्षण देण्यात आल्याचं अदानी पोर्ट्स आणि एसईझेड यांनी जारी केलेल्या एका पत्रकात सांगण्यात आलं आहे.
गुजरातमधील परिस्थिती बिघडू नये यासाठी सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. बंदरावरील सर्व जहाजांना सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्याचे तसंच सतत लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.
काश्मीरमधून अनुच्छेद ३७० काढून टाकल्यानंतर पाकिस्तानमधून दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाकिस्तानातील नेते गेल्या काही दिवसांपासून भारतासोबत युद्ध करण्याची गोष्ट बोलत आहेत. तसेच सीमेवर देखील पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन देखील होत आहे.