पेट्रोल-डिझेल आणखी महागणार

पेट्रोल ६ पैशांनी तर डिझेल ५ पैशांनी महाग

Updated: Feb 14, 2019, 01:47 PM IST
पेट्रोल-डिझेल आणखी महागणार title=

मुंबई : गेल्या काही महिन्यांपूर्वी इंधनाच्या दरात सतत वाढ होत होती. त्यानंतर शंभरीजवळ जाऊन पेट्रोल-डिझेलच्या किंमती काही प्रमाणात कमी झाल्या होत्या. मात्र आज पुन्हा एकदा तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल ६ पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत ५ पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर ७६.३ रूपये तर डिझेल ६८.७६ रूपये इतके आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ७०.३९ आणि डिझेल ६५.६७ रूपये आहे.

गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. तेल उत्पादनात झालेल्या कपातीमुळे गेल्या तीन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

तेल निर्यात कंपन्यांचा समूह ओपोक अर्थात ऑर्गेनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कन्ट्रीजद्वारा करण्यात येणाऱ्या तेल पुरवठ्यात कमी करण्यात आल्याने तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे. त्याशिवाय ओपेकचे सदस्य असलेल्या वेनेझुएलामध्ये आलेल्या आर्थिक आणि राजकीय संकंटामुळेही तेल पुरवठा प्रभावित झाला आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम भारतीय बाजारावर होण्याची शक्यता असून तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.