Kullu Manali : हिवाळ्याच्या हंगामात काश्मिरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढतो. श्रीनगर, हिमाचल प्रदेश, कुल्लू-मनाली (Kullu Manali) या ठिकाणी बर्फाची चादर पसरली असून पर्यटक आनंद लुटताना दिसत आहेत. पण आनंद लुटण्याच्या नादात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिमाचलमधल्या कुल्लू इथल्या डोभी इथं पॅराग्लाडिंग (Paragliding) करताना सेफ्टी बेल्ट उघडल्याने एका महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. जिल्हाप्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेनंतर या साईटवरुन पॅराग्लायडिंग करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच पॅरग्लायडिंगला परवानगी दिली जाणार आहे. महिलेच्या मृत्यूचं कारण सेफ्टी बेल्टमधील त्रुटी (Sefti Belt Fault) असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी पॅराग्लायडर पायलटविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पॅराग्लायडर आणि पॅराग्लायडिंग संस्थेचं रजिस्ट्रेशन आहे. पॅरायग्लायडींग करतेवेळी सेफ्टी बेल्ट उघडल्याने महिला उंचावरुन खाली पडली. यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पर्यटन विभागाकडून कुल्लू-मनालीतील सर्व पॅराग्लायडिंग संस्थांची बैठक बोलावण्यात आली आहे. नियमांचं पालन करण्यासाठी एक एसओपी जारी केला जाणार आहे.
कुल्लू जिल्ह्यात पॅराग्लायडिगदरम्यान दुर्घटना वाढल्या आहेत. यातील अनेक प्रकरणात हवेचा अंदाज न येणं आणि पैसा कमवण्यासाठी जास्त उड्डाण करणं ही आहेत. टेक ऑफ करताना हवा कोणत्या दिशेला आहे याचा अंदाज घेतला जातो. पण केवळ जास्त पैसे कमवण्यासठी अनेक संस्थांकडून नियम डावलले जातात. परिणामी अशा दुर्घटना घडतात.
2018 पासून आताप्यंत एकट्या कुल्लू जिल्ह्यात पॅराग्लायडिंग दुर्घटनेत 8 पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. याशिवाय कांगडा जिल्ह्यात 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पॅराग्लायडिंगच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.
कोण होती महिला?
मिळालेला माहितीनुसार 26 वर्षांच्या मृत महिलेचं नाव नव्या असं होतं. नव्या आपल्या पतीबरोबर 9 फेब्रुवारीला चंदीगडहून मनालीला फिरण्यासाठी आली होती. नव्या आपल्या पतीबरोबर पॅराग्लायडिंग करण्यासाठी फलाइन या ठिकाणी पोहोचले. या ठिकाणी नव्याने ट्रेनरबरोबर पॅराग्लायडिंग सुरु केली. पण उड्डाणादरम्यान तिचा सेफ्टी बेल्ट उघडला आणि उंचीवरुन ती खाली कोसळली. यात तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर डोभी साईटवर पॅराग्लायडिंग करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पॅराग्लायडिंगच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पॅराग्लायडिंग संघटनेने मात्र नियमांचं पालन होत असल्याचं म्हटलं आहे. आगामी काळात अशा घटना घडू नयेत यासाठी दिशा निर्देश जाहीर करण्यात येणार असल्याचं संघटनेने सांगितलं आहे.