महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट निश्चित? थोड्याचवेळात गृहमंत्रालयाची पत्रकारपरिषद

या पत्रकारपरिषदेत ते महाराष्ट्राबद्दल मोठी घोषणा करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

Updated: Nov 12, 2019, 04:42 PM IST
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट निश्चित? थोड्याचवेळात गृहमंत्रालयाची पत्रकारपरिषद

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तास्थापनेच्या गोंधळामुळे महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरु झाली आहे. काहीवेळापूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपतींना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता दिल्लीत गृहमंत्रालयाची पत्रकारपरिषद होईल. यावेळी केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील. या पत्रकारपरिषदेत ते महाराष्ट्राबद्दल मोठी घोषणा करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

विधानसभा निवडणुकीच्या निकालाला २० दिवस उलटले तरी कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करण्यात यश आलेले नाही. काल राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बोलावून मंगळवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत सरकार स्थापन करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी राज्यपालांना फोन करून सत्तेचा दावा करण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. राष्ट्रवादी संख्याबळ जुळवण्यात असमर्थ असल्याचेही अजित पवार यांनी राज्यपालांना म्हटले होते. त्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली असल्याचे समजते.

'काँग्रेस राष्ट्रवादी-शिवसेनेला समर्थन देण्यासाठी तयार पण...'

राज्यपालांनी मात्र ट्विट करून 'राष्ट्रपती राजवटीची शिफारस सूचित करणारं पत्र पाठवण्यात आल्याचं' स्पष्ट केले. राज्यपालांनी घटनेच्या कलम ३५६ नुसार केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सादर केल्याची माहिती राजभवनाने दिली.