हैदराबाद : हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या चारही आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. घटनास्थळी नेत असताना चौघांचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. या एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. घटनास्थळावर नेल्यानंतर आरोपींनी पोलिसांकडची शस्त्र हिसकावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला, असं स्पष्टीकरण हैदराबाद पोलिसांनी दिलं आहे.
सायबराबाद पोलीस आरोपींना घेऊन घटना कशी घडवण्यात आली, हे पाहण्यासाठी घेऊन गेले. यावेळी आरोपींनी पोलिसांवर त्यांचीच शस्त्र घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पोलिसांवर गोळीबारही केला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपींवर गोळीबार केला, यामध्ये ते मारले गेले, असं पोलीस उपायुक्त शमशाबाद प्रकाश रेड्डी यांनी सांगितलं.
DCP Shamshabad Prakash Reddy: Cyberabad Police had brought the accused persons to the crime spot for re-construction of the sequence of events. The accused snatched weapon and fired on Police. In self defence the police fired back, in which the accused were killed. #Telangana https://t.co/4wAH9W8g3O
— ANI (@ANI) December 6, 2019
हैदराबादमध्ये २७ नोव्हेंबरला ४ आरोपींनी पहिले पीडित महिलेची गाडी पंक्चर केली आणि मदत करण्याचं नाटक केलं. यानंतर चारही आरोपी तिला टोल प्लाझाजवळच्या निर्जन स्थळी घेऊन गेले. याठिकाणी महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली.
डॉक्टर महिलेवर अत्याचार केल्यानंतर पेट्रोल पंपावरून पेट्रोल विकत घेऊन तिला हैदराबाद-बंगळुरू नॅशनल हायवेवर तिला जाळण्यात आलं. चारही आरोपींना २९ नोव्हेंबरला अटक करण्यात आली. या प्रकरणावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देशभरातून करण्यात येत होती.