बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड नाही, एकनाथ शिंदेंचा पुन्हा हुंकार

शिवसेना सोडणार नाही असा एल्गार एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Updated: Jun 22, 2022, 07:12 AM IST
बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड नाही, एकनाथ शिंदेंचा पुन्हा हुंकार title=

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्यांच्या आमदारांसह मंगळवारी रात्री सुरतहून गुवाहाटीत दाखल झालेत. गुवाहाटी विमानतळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना सोडणार नाही असा एल्गार एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

गुवाहाटीकडे रवाना होताना सुरत विमानतळावर एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्ही शिवसेना सोडलेली नाही, सोडणार नाही. बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्वाचा विचार दिला, त्याच्याशी आम्ही तडजोड करणार नाही."

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. शिवसेना आमदारांनी पक्षाविरुद्ध कोणतीही भूमिका घेतलेली नाही. हिंदुत्व आणि आनंद दिघेंचे विचार यांचा राजकीय फायद्यासाठी वापर कधीही करणार नाही"

मुख्यमंत्र्यांशी फोनवरून काल चर्चा

एकनाथ शिंदे हे सध्या या आमदारांसोबत सूरतच्या एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांची सूरतमध्ये जाऊन शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांनी भेट घेतली होती. या भेटीदरम्यान एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाली.

भेटीदरम्यान हिंदूत्व आणि इतर विषयांवरून एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. फोनवरून झालेल्या चर्चेदरम्यान परतण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेसमोर ठेवला. मात्र शिंदे यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिवसेना आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील शिवडीचे आमदार अजय चौधरी हे शिवसेनेचे विधमंडळातील नवे गटनेते असतील.