बारावी निकाल: परीक्षा न देताच पास, अनेकांना १०२ टक्के गुण

....

Updated: Jun 9, 2018, 11:59 AM IST
बारावी निकाल: परीक्षा न देताच पास, अनेकांना १०२ टक्के गुण title=

पाटना: दोन वर्षांपूर्वी उघड झालेल्या टॉपर्स घोटाळ्यानंतर बिहारमध्ये आता पुन्हा एकदा १२ परीक्षेतला घोळ पुढे आला आहे. यंदाच्या वर्षी दिलेल्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यी पेपर न देताही पास झाले आहेत. तर, काहींना प्रश्नपत्रीकेतील एकूण मार्क्सपैकीही अधिक गुण मिळाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. बिहार स्कूल एग्जामिनेशन बोर्डाचा इयत्ता १२वीचा निकाल शुक्रवारी लागला. त्यानंतर निकाल आणि परिक्षेबाबतचा हा घोळ पुढे आला.

३५ पैकी ३८ गुण

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अरवल जिल्ह्यातील भीम कुमार नावाच्या एका उमेदवाराला गणितात (थेअरी) एकूण ३५ गुणांच्या पेपरमध्ये चक्क ३८ गुण मिळाले आहेत. तर, ऑब्जेक्टिव प्रश्नांमध्येही ३५ गुणांपैकी ३७ गुण मिळाले आहेत. विद्यार्थ्याने म्हटले आहे की, मला आश्चर्य वाटते आहे की, राज्याच्या बोर्ड परीक्षेत अशा प्रकारच्या गोष्टी घडतातच कशा..?

अनेक विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक प्रकार

दरम्यान, चंपारण जिल्ह्यातही असाच प्रकार घडला असून, येथे राहणाऱ्या संदीप राजला भौतिकशास्त्रात (फिजिक्स) थेअरी पेपरला ३५ पैकी ३८ गुण मिळाले. या विद्यार्थ्याने म्हटले आहे की, असे घडूच कसे शकते. मला इंग्रजी आणि राष्ट्रभाषा हिंदीमध्ये ऑब्जेक्टिव टाईप पेपरला शून्य गुण मिळाले आहे. दरभंगा येथील राहुल कुमारसोबतही असेच घडले असून, त्याला गणितात ऑब्जेक्टिव पेपरमध्ये चक्क ३५ पैकी ४० गुण मिळाले आहेत. वैशाली जान्हवी सिंह हिला बायोलॉजिमध्ये १८ गुण मिळाले. पण, तिचा दावा असा की, तिने बायोलॉजिचा पेपरच नाही दिला. पेपर न देता गुण मिळण्याचा प्रकार पटणातील सत्या कुमारसोबतही घडला आहे.