Albanese India Visit: हिंदू मंदिरांवरील हल्ल्यावरुन मोदींनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना सुनावलं! म्हणाले, "ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर हल्ले..."

Anthony Albanese India Visit: मागील 2 महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या भागांत 4 मोठ्या हिंदू मंदिरांवर समाजकंटकांनी हल्ला केल्याचे प्रकार घडले असून यासंदर्भात थेट मोदींनीच ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांकडे यासंदर्भात आक्षेप नोंदवला आहे.

Updated: Mar 10, 2023, 06:24 PM IST
Albanese India Visit: हिंदू मंदिरांवरील हल्ल्यावरुन मोदींनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना सुनावलं! म्हणाले, "ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर हल्ले..." title=
Modi raises temple attack issue

Australian PM Anthony Albanese India Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) नुकतीच ऑस्ट्रेलियामधील हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांच्या मुद्द्यावरुन ऑस्ट्रेलियन पंतप्रधान (Australian PM) अँथनी अल्बनीज (Anthony Albanese) यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी अल्बनीज यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. त्याचवेळी त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये मंदिरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या प्रकारासंदर्भात आपला आक्षेप थेट तेथील सर्वोच्च नेत्यांकडे व्यक्त केला.

मोदी काय म्हणाले?

अल्बनीज यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी, "हे फार दु:खदायक आहे की मागील काही आठवड्यांपासून ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर हल्ले होण्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. स्वाभाविक गोष्ट आहे की अशा बातम्या वाचल्यानंतर भारतामधील सर्वांनाच यासंदर्भात चिंता वाटते. अशा घटनांबद्दल ऐकून आमचं मन व्यथित होतं," असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. "आपल्या सर्वांच्या या भावना मी पंतप्रधान अल्बनीज यांच्यासमोर ठेवल्या. त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की भारतीयांना ऑस्ट्रेलियामध्ये सुरक्षित वाटावं ही आपली पहिली प्राथमिकता आहे. या विषयासंदर्भात आमच्या तुकड्या एकमेकांच्या संपर्कात राहतील. दोन्ही तुकड्या एकमेकांना आवश्यक असणारी सर्व मदत करतील," असंही मोदींनी अल्बनीज यांच्याबरोबर झालेल्या चर्चेबद्दलची माहिती देताना पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

2 महिन्यात या 4 मोठ्या घटना

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार मागील 2 महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये मंदिरांवर हल्ले झाल्याच्या एकूण 4 घटना घडल्या आहेत. ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेनमधील एका मुख्य हिंदू मंदिरावर खलिस्तान समर्थकांनी 4 मार्च रोजी हल्ला करुन मंदिरातील वस्तूंची तोडफोड केली होती. ही घटना येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये घडली होती. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार या घटनेनंतर हिंदू ह्यूमन राइट्सच्या निर्देशिका सारा गेट्स यांनी अशा घटनांच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियात राहाणाऱ्या हिंदूंमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं. 

गेट्स यांनी, "ही घटना जागतिक स्तरावर 'सिख फॉर जस्टिस'चा एक पॅटर्न आहे. हा प्रकार म्हणजे उघडपणे ऑस्ट्रेलियातील हिंदूंमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी घडवून आणलेला आहे. ही संघटना (खलिस्तान समर्थक) अपप्रचार, सायबर बुलिंग करण्याबरोबरच धमकावण्याचा प्रकारही करतात," असंही म्हटलं आहे. 

पीटीआयच्या वृत्तानुसार यापूर्वी 23 जानेवारी रोजी मेलबर्नमधील अल्बर्ट पार्कमधील प्रसिद्ध अशा इस्कॉन मंदिरातील भिंतींवर 'हिंदुस्तान मुर्दाबाद' असं लिहिण्यात आलं होतं. यापूर्वी 16 जानेवारी रोजी व्हिक्टोरियामधील कॅरम डाउन्समधील ऐतिहासिक श्री शिव विष्णू मंदिरामध्येही अशीच तोडफोड करण्यात आली होती. 12 जानेवारी रोजी मेलबर्नमध्ये स्वामीनारायण मंदिराला 'असामाजिक तत्वांनी' भारताविरोधात घोषणाबाजी केली होती.