नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांनी मंगळवारी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी आणखी एक थक्क करणारी गोष्ट लोकांच्या लक्षात आणून दिली. कोरोनाशी लढताना गेल्या तीन महिन्यांच्या काळात भारताने ८० कोटी लोकांना मोफत धान्यवाटप केले आहे. याची तुलना करायची झाल्यास आपण अमेरिकन लोकसंख्येच्या अडीचपट, ब्रिटनच्या १२ पट आणि युरोपियन महासंघातील देशांच्या एकूण लोकसंख्येच्या दुप्पट लोकांना मोफत धान्यवाटप करत असल्याचे मोदींनी सांगितले.
नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी भारतीयांना मोफत रेशन दिलं जाणार : पंतप्रधान मोदी
PM Gareeb Kalyan Anna Yojana योजनेतंर्गत ८० कोटी लोकांना मोफत धान्यवाटप केले जात आहे. योजनेसाठी पात्र ठरलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला महिन्याला पाच किलो तांदूळ किंवा गहू मोफत दिले जातात. तसेच एक किलो चनाडाळही मोफत दिली जाते. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही योजना सुरु ठेवण्यासाठी केंद्र सरकारला ९० हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. यापूर्वीच्या तीन महिन्यांच्या हिशेब केल्यास या योजनेसाठी सरकारी तिजोरीतून तब्बल दीड लाख हजार कोटी खर्च होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. शेतकरी आणि प्रामाणिक करदात्यांमुळे आपल्याला मोफत धान्यवाटप करणे शक्य होत आहे. त्यासाठी मी या दोघांचेही आभार मानत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.