धक्कादायक! 'त्या' संघर्षात चीनकडून भारतीय जवानांवर धारदार शस्त्रांनी वार

भारतीय जवानांनी अतिशय धाडसानं उत्तर दिलं

Updated: Jun 22, 2020, 11:53 AM IST
धक्कादायक! 'त्या' संघर्षात चीनकडून भारतीय जवानांवर धारदार शस्त्रांनी वार title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : indiavschina लष्करातील कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्त्वाखाली १५-१६ जूनच्या रात्री चीनच्या सैन्याशी भारतीय सैनिकांनी दोन हात केले. यामध्ये अतिशय हिंसक स्वरूपाची ही झडप झाल्याचं वृत्त समोर आलं ज्यानं एकच खळबळ माजली. सूत्रांच्या माहितीनुसार या संघर्षामध्ये जवानांना बऱ्याच गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या असून, त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

चिनी सैनिकांना भारतीय जवानांनी अतिशय धाडसानं उत्तर दिलं. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणी पहिली प्रतिक्रिया देत आपले जवान (चीनच्या सैनिकांना) मारता मारता मृत्यूच्या दारी पोहोचले असं वक्तव्य केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अशी हमीही राष्ट्राला दिली. 

काही तासांसाठी चाललेल्या या संघर्षामध्ये पाण्यात बुडण्यामुळं, अतीथंडीमुळं जवानांना बऱ्याच जखमा झाल्याचं उघडल झालं आहे. लेहमधील सोनम नरबू मेमोरियल रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका ड़ॉक्टरांनी गोपनीयतेच्या अटीवर इंडियन एक्सप्रेसला महत्त्वाची माहिती दिली. शहीद जवानांचे मृतदेह पाहता त्यावरील जखमा संघर्ष किती मोठा आणि हिंसक स्वरुपाचा होता याची प्रचिती देतात असं सांगितलं. धारदार शस्त्राचे वार आणि बरगड्यांना लागलेला मार पाहता बहुतांश जवानांची हीच परिस्थिती पाहायला मिळाल्याचंही त्यांनी उघड केलं. 

चिनी सैनिकांचे हे वार झेलत भारतीय सैनिकांनी त्यांना तोडीस तोड उत्तर दिलं हेसुद्धा अधोरेखित करण्याजोगं. भारतीय सैन्यातील कमांडींग ऑफिसर कर्न संतोष बाबू यांच्यावर हल्ला केल्यानंतर भारतील जवानांनी चीनच्या तुकडीवर सबळ हल्ला चढवला अशी माहिती एका जखमी भारतीय जवानानं दिली होती. 

 

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; लष्कराचे नायब सुभेदार शहीद

 

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार गलवान खोऱ्यात झालेल्या या संघर्षानंतर जवळपास १८ जवानांना लेहमधील रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं. कर, उर्वरित ४० जवानांवर सैन्याच्या इतर रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. असं असलं तरीही अद्यापही सैन्याकडून मात्र या आकडेवारीबद्दल काहीच स्पष्टोक्ती करण्यात आलेली नाही.