नवी दिल्ली : चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर भारताने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. चीनी कंपन्यांना भारतातल्या महामार्ग बांधकामांमध्ये (हायवे प्रोजेक्ट्स) सहभागी होता येणार नाही, असं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. कोणतीही चीनी कंपनी हायवे प्रोजेक्ट्सच्या कंत्राटासाठी अर्ज करता येणार नाही.
चीनी कंपन्यांनी एखाद्या भारतीय किंवा इतर देशांच्या कंपनीसोबत जॉईंट व्हेन्चर करून अर्ज केला तरी देखील त्यांना परवानगी दिली जाणार नाही, असं गडकरींनी स्पष्ट केलं आहे. चीनी गुंतवणूकदारांना भारतात सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसोबत इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीपासून रोखण्यात येईल, असंही गडकरी म्हणाले.
चीनसोबत सीमेवर तणाव वाढल्यानंतर भारताने टिकटॉकसह ५९ चिनी ऍप्सवर बंदी घातली. भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडत्व, भारताची सुरक्षा तसंच राज्याची सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेसाठी धोका असल्यामुळे या ऍप्सवर बंदी घालत असल्याचं सरकारने सांगितलं.