श्रीनगर : भारतीय सैन्यदलातील ११ गढवाल रायफल्स या तुकडीतील एक जवान गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. दैनंदिन रुपरेषेप्रमाणे गस्त घालत असतानाच ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या बेपत्ता होण्याची माहिती मिळतातच लगेच शोधमोहिम हाती घेण्यात आली.
राजेंद्र सिंह नेगी असं त्यांचं नाव असून, गुलमर्ग येथील फॉरवर्ड पोस्टवर ते तैनात होते. गुलमर्ग सेक्टरमधील पोस्टवर तैनात असतानाच त्यांचा पाय घसरला आणि ते जवळपास २०० मीटर खाली गेले. सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सैन्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता जवानाचा शोध घेण्यासाठी सैन्याच्या अनेक तुकड्या फॉरवर्ड पोस्टवर पाठवण्यात आल्या आहेत. हवालदार राजेंद्र सिंह नेगी यांचं कुटुंब देहरादूनमध्ये असतं. त्यांच्या पत्नीकडून मिळालेल्या माहितीनुसार ते बेपत्ता झाल्याची माहिती ८ जानेवारीला त्यांच्यापर्यंत पोहोचली. तेव्हापासूनच संपूर्ण कुटुंबात चिंतेचं आणि भीतीचं वातावरण आहे.
नेगी यांच्या पत्नी राजेश्वरी यांनी आपल्या पतीचा लवकरात लवकर शोध घेण्यात यावा आणि त्या अनुशंगाने पावलं उचलावीत अशी आर्जव शासनाकडे केली आहे. सैन्यदल प्रवक्ते कर्नल देवेंद्र आनंद यांच्या माहितीनुसार राजेंद्र सिंह नेगी यांच्या बेपत्ता होण्याची माहिती मिळताच तातडीने त्यांचा शोध घेण्यासाठीची पावलं उचलली गेली. शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याबाबत माहिती देण्यात आली.