Indian Navy Recruitment 2024: भारतीय नौदलाबद्दल बहुसंख्य तरुणांना आकर्षण असतं. येथे नोकरी मिळावी यासाठी अनेक तरुण प्रयत्नशील असतात. कारण चांगल्या पगारासह पद आणि प्रतिष्ठादेखील या नोकरीमध्ये मिळते. असे असले तरी अनेकांना येथील भरती प्रक्रिया कधी निघते? याबद्दल माहिती नसते. तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. भारतीय नौदलात काम करण्याची संधी चालून आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
भारतीय नौदलाअंतर्गत सिनिर सेकेंडरी SSR वैद्यकीय सहाय्यक भरतीसाठी नोटिफिकेश जारी करण्यात आले आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 7 सप्टेंबरपासून सुरू झाली असून उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.
वैद्यकीय सहाय्यक पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांसह बारावी परीक्षेत किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक विषयात किमान 40 टक्के गुण असावेत.
वैद्यकीय सहाय्यक पदाच्या अर्जदाराचे वय 1 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान असावे. तसेच उमेदवाराची उंची 157 सेमी आणि छाती 5 सेमी असावी.
या रिक्त पदांसाठी उमेदवाराची निवड 4 टप्प्यांतून केली जाईल. प्रथम 12वी मध्ये मिळालेल्या गुण पाहिले जातील. यानंतर त्यांची शारीरिक चाचणी द्यावी लागेल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांची वैद्यकीय परीक्षादेखील घेतली जाईल. हे टप्पे पार केल्यानंतर, यशस्वी उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर त्यांना नौदलातील वैद्यकीय सहाय्यक सेवेत सामावून घेतले जाईल.
प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा 14 हजार 600 रुपये वेतन दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना संरक्षण वेतन मॅट्रिक्स स्तर 3 अंतर्गत 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपये इतका पगार दिला जाईल. मूळ वेतनाव्यतिरिक्त, त्यांना 5200 रुपये लष्करी सेवा वेतन आणि इतर भत्ते म्हणून दिले जातील.
या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 17 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जात काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या.