आताची मोठी बातमी, नवी दिल्ली दरभंगा एक्स्प्रेसला भीषण आग

Train Fire : नवी दिल्ली-दरभंगा (02570) एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची घटना आहे. उत्तर प्रदेशच्या इटावा भागात ट्रेनच्या बोगीला लागली. घटनास्थळी अग्निशमदलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

राजीव कासले | Updated: Nov 15, 2023, 08:06 PM IST
आताची मोठी बातमी, नवी दिल्ली दरभंगा एक्स्प्रेसला भीषण आग title=

Train Fire : भारतीय  रेल्वेच्या दुर्घटना थांबण्याचं नाव घेत नाहीए. नवी दिल्ली-दरभंग एक्स्प्रेसच्या ( New Delhi Darbhanga Express) बोगीला भीषण आग लागली. यात तीन बोगी जळून खाक झाल्याची माहिती आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं. नवी दिल्लीवरून दरभंग्याला ही एक्स्प्रेस जात होती. उत्तर प्रदेशमधल्या इटाव्यातल्या (Etawah) सराय भूपत रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. ही आग इतकी भीषण आहे की दूरवरुन आगीचे लोट दिसत आणि धूर दिसत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. सध्या आगीत जिवीतहानी झाल्याची माहिती नाही. 

छठपूजेचं महापर्व सुरु आहे. झारखंड आणि उतरप्रदेशमध्ये हा सण मोठ्याप्रमाणावर साजरा केला जातो. यावेळी छठपूजेचा सण 17 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरदरम्यान साजरा केला जात आहे. देशातील इतर राज्यात राहाणारे बिहार, झारखंड आणि उत्तप्रदेशचे नागरिक या सणासाठी आवर्जुन आपल्या घरी येतात. या सणानिमित्ताने नवी दिल्लीहून अनेक नागरिका उत्तरप्रदेशमध्ये नवीदिल्ली-दरभंगा एक्स्प्रेसने येत होते. एक्स्प्रेसच्या तीन बोगींना आग लागली. आग लागताच प्रवाशांनी बोगीतून खाली उडी मारत आपला जीव वाचवला. 

मुंबई, सूरत, अहमदाबाद ते दिल्लीपर्यंतच्या सर्व ट्रेन खचाखच भरलेल्या आहेत. ट्रेनमध्ये पाय ठेवायलाही जागा नाहीए. प्रवासी पंख्याला लटकून प्रवास करतायत. अशात आगीच्या घटनांनी एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दरभंगा क्लोन स्पेशल ट्रेन 02570  नवी दिल्लीहून दरभंगाला जाण्यासाठी रवाना झाली. ही ट्रेन उत्तर प्रदेशमधल्या इटावा जिल्ह्यातील सराय भूपत रेल्वे स्थानकावर पोहोचली. त्याचवेळी ट्रेनच्या एका बोगीतून धूर येऊ लागला. धुर पाहातच मोटरमनने तात्काळ ट्रेन थांबवली आणि इटावा स्टेशवर याची माहिती दिली. दरम्यान ट्रेनमधले सर्व प्रवासी तात्काळ खाली उतरले. त्यामुळे मोठी जिवीतहान टळली. सूचना मिळताच जीआरपी, आरपीएसचं पथक घटनास्थळी दाखल झाले. 

अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. ही आग इतकी भीषण होती की दूरपर्यंत आगीचे लोळ दिसत होते. 

दरम्यान, ट्रेनला आग लागण्याची ही पहिलीच वेळ नाहीए. समस्तीपूरमध्ये भागलपूरहून जयनगर इथं जाणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये स्फोट होऊन आग लागली होती. यात काही प्रवासी होरपळले गेले होते. याप्रकरणी आरपीएफ पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची अद्याप चौकशी सुरु आहे.