Indian Railway : भारतीय रेल्वे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वेच्या जाळ्यांपैकी एक. अशा या रेल्वे विभागानं मागील बऱ्याच वर्षांमध्ये इतकी झपाट्यानं प्रगती केली की, पाहताना अनेकांनाच आश्चर्य वाटलं. आता याच रेल्वे विभागानं प्रवाशांच्या हितासाठी पुन्हा आणखी एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय मोठ्या संख्येनं प्रवाशांसाठी लाभदायक ठरणार आहे. कारण आता रेल्वे विभागाच्या वेळापत्रकात आणखी एका ट्रेनची भर पडणार आहे.
प्रवाशांना एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी विविध श्रेणींमधील ट्रेनची व्यवस्था रेल्वे विभाग करताना दिसतो. अशा या रेल्वे विभागानं नुकतीच एक मोठी घोषणा करत नवी ट्रेन वेळापत्रकात समाविष्ट करून घेतली. या रेल्वेसाठी Railway Board नं मंजुरीही दिली. ही नवी ट्रेन नवी दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल (Anand Vihar Teminal) वरून सुटणार असून, कोटद्वारपर्यंत जाणार आहे. अद्यापही या ट्रेनचा क्रमांक मात्र कळू शकलेला नाही.
रेल्वे विभागाच्या माहितीनुसार ही ट्रेन मेरठ, मुजफ्फरनगर, देववंद, टपरी, रूड़की, नजीबाबादवरून कोटद्वारपर्यंत जाईल. शिवाय उत्तर प्रदेशातील नजीबाबाद वरून दिल्लीपर्यंतचा सरसकट प्रवासही इथं प्रवाशांना करता येणार आहे. अद्यापही ट्रेन क्रमांक समोर आला नसला तरीही ही रेल्वे दर दिवशी निर्धारित स्थानकांदरम्यान धावणार असल्याचं रेल्वे विभागाकडून सांगण्यात येत आहे.
रेल्वे बोर्डानं दिलेल्या मंजुरीनंतर ही ट्रेन वेळापत्रकात समाविष्ट करण्या आली. जिथं ती रात्री 21.45 वाजता आनंद विहारवरून निघणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी पहाटे 03.50 मिनिटांनी कोटद्वार येथे पोहोचेल. तर ही ट्रेन, परतीच्या प्रवासासाठी कोटद्वार येथून रात्री 22.00 वाजता निघून दुसऱ्या दिवशी पहाटे 04.35 वाजता आनंद विहार टर्मिनल येथे पोहोचेल.
रेल्वे विभागानं अद्यापही ही रेल्वे नेमकी कोणत्या तारखेपासून सुरु होणार आहे याबाबतचा खुलासा केलेला नाही. पण, येत्या काही दिवसांमध्येच ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी परिस्थिती पूरक असणार आहे त्यामुळं आता मोठ्या संख्येनं प्रवाशांचा प्रवास सुकर होणार असून, रेल्वेचा एक नवा मार्ग कार्यान्वित होणार हे नक्की.