इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची साइट आणि ॲप गुरुवारी बंद झाली आहे. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर तिकीट काढता येत नसल्याच्या तक्रारी करत आहेत. DownDetector एक असं प्लॅटफॉर्म जो ऑनलाइन आउटेजचा मागोवा घेतो, त्यांनी देखील साइट्स डाउन झाल्याच आपल्या अहवालात म्हटलं आहे.
IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार, मेंटेनेन्स ऍक्टिविटीमुळे ही वेबसाईट डाऊन झाल्याच सांगण्यात येत आहे. IRCTC ॲप उघडल्यावर, 'देखभालीमुळे कोणतीही कृती करू शकत नाही' अशी त्रुटीचे पॉप-अप दिसते. त्याचवेळी IRCTC साईटवर 'सॉरी!!!' कृपया पुन्हा प्रयत्न करा!' मेसेज येत आहे. तसेच तिकीट रद्द करण्यासाठी / TDR फाइल करण्यासाठी कृपया कस्टमर केअर नंबर 14646,08044647999 आणि 08035734999 वर कॉल करा किंवा etickets@irctc.co.in वर मेल करा, अशी माहिती येत आहे.
सोशल मीडियावर अनेक युझर्स या आउटेजबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. रेल्वे मंत्री यांना टॅग करताना एका यूझरने सांगितले की, 'सकाळी 10 वाजता IRCTC साईट क्रॅश होते आणि जेव्हा ती उघडते तेव्हा सर्व तत्काळ तिकिटे बुक होतात. हा घोटाळा नाही तर काय आहे?
आणखी एका युझरने लिहिले की, 'भारत चंद्रावर पोहोचला, पण भारतीय रेल्वे तिकीट बुकिंग ॲप क्रॅश झाल्याशिवाय झटपट बुकिंग हाताळू शकत नाही. हे 2024 आहे, आणि एक स्थिर सर्व्हर ठेवणे हे रॉकेट सायन्स नसावे!' असा सवाल देखील आपल्या पोस्टमधून केला आहे.
महिन्याभरात दुसऱ्यांदा IRCTC ची वेबसाईड डाऊन झाली आहे. या अगोदर 9 डिसेंबरलाही आयआरसीटीसीची साईट तासाभरासाठी बंद करण्यात आली होती. याचे कारणही ई-तिकीटिंग प्लॅटफॉर्मने मेंटेनन्स असल्याचे सांगितले. आजच्या समस्येमुळे ते प्रवासी संतप्त झाले आहेत जे तत्काळ तिकीट काढण्याचा प्रयत्न करत होते. मूळ स्थानकावरून ट्रेन सुटण्याच्या एक दिवस आधी हे बुक केले जाऊ शकतात. एसी क्लासचे बुकिंग सकाळी 10 वाजता सुरू होते आणि नॉन-एसी क्लासचे बुकिंग सकाळी 11 वाजता सुरू होते.