IRCTC ला एका दुकानदाराने काढले मूर्खात; साइट हॅक करून विकली लाखोंची तिकिटे

IRCTC website Hacked: आयआरसीटीसीटची वेबसाईट एका व्यक्तीने हॅक केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी वेबसाइटच हॅक करुन 30 लाख रुपयांची तत्काळ तिकिटेही विकली. आयआरसीटीसीच्या कारभारावर ही खूप मोठी चपराक मानली जात आहे. दरम्यान वेबसाईट हॅक करणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीला रेल्वे संरक्षण दलाने (RPF) अटक केली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 17, 2023, 05:17 PM IST
IRCTC ला एका दुकानदाराने काढले मूर्खात; साइट हॅक करून विकली लाखोंची तिकिटे title=

IRCTC website Hacked: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची नाचक्की करणारी घटना समोर आली आहे. आयआरसीटीसीटची वेबसाईट एका व्यक्तीने हॅक केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी वेबसाइटच हॅक करुन 30 लाख रुपयांची तत्काळ तिकिटेही विकली. आयआरसीटीसीच्या कारभारावर ही खूप मोठी चपराक मानली जात आहे. दरम्यान वेबसाईट हॅक करणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीला रेल्वे संरक्षण दलाने (RPF) अटक केली आहे. 

आरोपीचे रेल्वे तिकीट बुकिंगचे दुकान 

मोईनुद्दीन चिश्ती असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील दादरी येथील रहिवासी आहे. तो ग्रेटर नोएडा येथील अयोध्या गंजमध्ये तो रेल्वे तिकीट बुकिंगचे दुकान चालवतो. चिश्ती हा दोन वर्षांपासून हा घोटाळा करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

बेकायदेशीर सॉफ्टवेअरच्या साह्याने तिकीट बुकिंग

आरोपीने आयआरसीटीसी पोर्टलवर निनावी वैयक्तिक प्रोफाइल तयार केले. यासाठी त्याने नेक्सस, सिक्का व्ही 2 आणि बिग बॉस यासारख्या  बेकायदेशीर सॉफ्टवेअरचा वापर केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे अॅप्स नाव, प्रवासाची माहिती, ट्रेनची निवड आणि तिकीट बुकिंगसाठी पैसे भरण्यासाठी स्क्रिप्टचा वापर करतात. घोटाळा चालवणाऱ्या व्यक्तीने IRCTC मधील तत्काळ आणि VIP कोट्यातील तिकिटे मिळवण्यासाठी या हॅकचा वापर केला. त्याच्या मदतीने, मोईनुद्दीन इतर सामान्य प्रवाशांपेक्षा वेगाने तिकीट बुक करू शकतो. त्यानंतर तो ही तिकिटे प्रत्यक्ष बुकिंग किमतीच्या चौपटीने विकायचा, अशी माहिती तपासादरम्यान उघड झाली. 

आरोपीने भारतीय रेल्वेच्या अनेक कायद्यांचे उल्लंघन केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. IRCTC एजंटना तिकीट बुक करण्यासाठी कोणतेही थर्ड पार्टी सॉफ्टवेअर वापरण्यास मनाई आहे. एजंटने आयआरसीटीसीने जारी केलेले अधिकृत खाते वापरणे अनिवार्य असते. तसेच आयआरसीटीसी पोर्टलचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असते. 

दरम्यान आयपी अ‍ॅड्रेस ट्रेस करून आम्ही अयोध्या गंज, दादरी, गौतम बुद्ध नगर येथे पोहोचलो.  जिथे चिश्तीला सोमवारी संध्याकाळी अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. चौकशीदरम्यान, संशयिताकडे 88 ई-तिकीटे आढळून आली ज्याची किंमत 1.55 लाख रुपये असल्याचे पोलीस म्हणाले. 

दोन वर्षांत 30 लाख तिकिटांची विक्री

या अवैध मार्गाचा वापर करून आरोपींनी गेल्या दोन वर्षांत 30 लाख रुपयांची तिकिटे विकली होती. आरोपीकडे गणितमध्‍ये बीएससी पदवी देखील आहे, असे सांगितले जात आहे. आरोपी बेकायदेशीर कृत्यांमुळे स्थानिक सायबर क्राईम युनिटच्या निदर्शनास आला. यानंतर सायबर सेलने रेल्वे पोलीस दलाला सतर्क केले. त्यानंतर मोईनुद्दीन चिश्तीवर कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.