शोपिया चकमकीत जैशचा कमांडर ठार

 जवान आणि दहशतवाद्यांच्या या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. 

Updated: Jul 27, 2019, 02:21 PM IST
शोपिया चकमकीत जैशचा कमांडर ठार  title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यामध्ये आज सकाळी सुरु असलेल्या चकमकीत जवानांना मोठे यश मिळाले आहे. जवान आणि दहशतवाद्यांच्या या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये दक्षिण काश्मीरचा जैश कमांडर मुन्ना लाहौरी देखील होता. शोपिया जिल्ह्यात मुन्ना लाहौरी आपल्या सहकाऱ्यांसोबत ठाण मांडून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. शुक्रवारी रात्रीपासून याचा शोध घेण्यात येत होता. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जवानांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे अभियान चालवले आणि जैशच्या कमांडरला ठार केले. 

पाकिस्तानचा हा दहशतवादी आयएडी बनवणे तसेच स्थानिक निष्पापांची हत्या करण्यात सहभागी होता. जैश कमांडर मुन्ना लाहौरी 30 मार्च 2019 बनिहालमध्ये जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात जैश कमांडर मुन्ना लाहौरीचा हात होता. 

भारतीय लष्करी जवानांकडूंन वेळोवेळी मात खाऊनही काश्मीरमधील दहशतवादी मागे हटण्यास तयार नाही आहेत. काहीतरी कुरापत्या करत हे दहशतवादी काश्मीरचे वातावरण खराब करत असतात. आज पहाटे शापिया जिल्ह्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख अजून पटली नाही आहे. 

दक्षिण काश्मीरच्या शोपियातील बोना बाजारमध्ये 2 ते 3 दहशतवादी लपल्याची बातमी समोर आली होती. यानंतर जवानांनी संपूर्ण विभागाला घेरले आणि दहशतवाद्यांचा शोध सुरु केला.